आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखतींचे सत्र सुरू, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूकांचा खटाटोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी बहुतांश उमेदवारांनी भाजपच्या ‘कमळा’ ला पसंती देत गर्दी केली. इतर पक्षांकडून दुखावलेल्या असंतुष्टांनी मनसेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली, तर ‘रिपाइं’च्या कार्यकर्त्यांनी पक्ष निधी नको पण उमदेवारी द्या, असा आग्रह करीत उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी हट्ट धरला.
भारतीय जनता पक्ष, मनसे आणि रिपाइंने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करताच शक्तिप्रदर्शन करीत सर्वच कार्यकर्ते नियोजित स्थळी दाखल झाले. उस्मानपुरा परिसरातील भाजपच्या कार्यालयासमोर सकाळी आठ वाजल्यापासून उमेदवारांची समर्थकांसह वाहने जमा होण्यास सुरुवात झाली. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपनेते हरिभाऊ बागडे, डॉ. भागवत कराड, अतुल सावे, सुरेश बनकर, प्रवीण घुगे आणि बाळूअप्पा मेटे यांनी कार्यालय गाठले. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत जवळपास चारशे कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीविषयी माहिती देताना बागडे म्हणाले, मागील वेळी झालेल्या जागावाटपाचा फार्म्युला कायम राहील; परंतु या वेळी महायुती असल्याने रिपाइंला काही जागा सोडाव्या लागणार आहे. असे असलेतरी पूर्वीप्रमाणेच भाजपला जागा मिळतील असे दिसते. वैजापूरमध्ये आमदार आर.एम.वाणी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, तर आम्हालाही स्वतंत्रपणे लढावे लागेल. मात्र, शेवटपर्यंत युती होण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहणार असल्याचे बागडे यांनी सांगितले.
मनसेचेही मुलाखतसत्र - जिल्ह्यात कमळानंतर सोमवारी दुसरी पसंती मिळाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला. मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, पैठण येथे डॉ. सुनील शिंदे आणि कन्नड येथे आमदार हर्षवर्धन जाधव, गंगापूर व खुलताबादसाठी दिलीप बनकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. इतर पक्षाकडून दुखावलेले कार्यकर्ते समर्थकांसह गाडेकर यांच्या कार्यालयावर आले. बीड येथून मुलाखत घेण्यासाठी आलेले जिल्हाध्यक्ष अशोक तावरे यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद धीवर, उपस्थितीत मुलाखती झाल्या. मनसेकडून तिकीट मागणा-यांमध्ये फुलंब्री, औरंगाबाद तालुक्यातील उमेदवारांची संख्या मोठी होती. गाडेकर यांच्या कार्यालयात 22 जिल्हा परिषद आणि 44 पंचायत समिती सदस्यांसाठी मुलाखती घेण्याचे काम करण्यात आले. गंगापूर व खुलताबादच्या जागांसाठी दिलीप बनकर यांनी गंगापूर शहरात मुलाखती घेतल्या. या वेळी राष्ट्रवादी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत गवळी, रांजणगाव येथील प्रा.बी.जी.गायकवाड आणि शेंदूरवादा येथील डॉ.बेबी विठ्ठल वाघ यांनी ऐनवेळी पक्षात प्रवेश करीत उमेदवारी मागितली. पैठणमध्ये डॉ. सुनील शिंदे यांनी पैठणमध्ये मुलाखती घेऊन सत्ताधारी शिवसेनेला हादरा देण्याचा प्रयत्न केला.
‘रिपाइं’कडे धनदांडग्यांची गर्दी निधी नको उमेदवारी द्या - पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी निधी नाही मिळाला तरी चालेल मात्र आम्हाला महायुतीकडून उमेदवारी द्या अशी मागणी इच्छुकांनी केली. बसस्थानकाजवळील हॉटेल कार्तिकीमध्ये अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दोलत खरात, अरविंद अवचरमल आणि प्रकाश कांबळे यांनी मुलाखती घेतल्या. सकाळी अकरा ते दोन वाजेच्या दरम्यान अर्ज भरून घेऊन दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. रिपाइंला किती जागा मिळतील हे अद्याप ठरले नसून आमच्या पक्षाकडून खुल्या प्रवर्गाच्या जागेवरही निवडणूक लढण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे, असे कदम यांनी सांगितले.
काँग्रेसच्या मुलाखती सोयगाव तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व इच्छुकांची बैठक गांधी भवन येथे घेण्यात आली. या वेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी गट, गणनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या बैठकीस काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्तार यांनी गट, गणातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उमेदवारी कोणास देण्यात यावी याबाबत सर्वांची मते जाणून घेतली. काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसावी, असे आवाहन सत्तार यांनी केले.