आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Loss Corporater Agitation In Aurangabad

पडलेल्या उमेदवाराने काढला माजी नगरसेवकाच्या घरावर मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवडणुकीतील पराभवाच्या रागातून एका उमेदवाराने पाण्याच्या कारणावरून चक्क माजी नगरसेवकाच्याच घरावर मोर्चा काढण्याचा प्रकार रविवारी घडला. विशेष म्हणजे विद्यमान नगरसेविकेचे घर जवळच असताना त्यांच्याकडे अथवा मनपाच्या पाण्याच्या टाकीवर मात्र हा मोर्चा काढण्यात आला नाही.

सिडकोतील श्रीकृष्णनगर वॉर्डात रविवारी दुपारी हा प्रकार घडला. या भागाचे माजी नगरसेवक महेश माळवतकर यांच्या घरावर ५०च्या आसपास नागरिकांनी महिलांसह हंडे घेऊन मोर्चा काढला. कारण होते सकाळी साडेसहा वाजता येणारे पाणी दुपारपर्यंत आले नव्हते.

या अजब मोर्चाचे कारण शोधले असता हाती आलेली माहिती मोठी रंजक आहे. भाजपचे माळवतकर हे या भागाचे नगरसेवक होते. सिडको हडकोच्या पाणीप्रश्नावर कायम भांडणारे नगरसेवक अशी त्यांची ख्याती होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा वॉर्ड महिला राखीव झाला. तेथे भाजपच्या उमेदवार शोभा वळसे उभ्या होत्या त्यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर मनोहर बनकर यांच्या पत्नी उभ्या होत्या. या निवडणुकीत माळवतकर यांनी वळसे यांचे काम केले. माळवतकर यांच्यामुळे आपला पराभव झाल्याची सल असल्याने आज पाण्याचा प्रश्न निर्माण होताच बनकर यांच्या समर्थकांनी हा मोर्चा काढल्याचे समजते. दुपारी तीन ते चार असे सुमारे एक तास हे आंदोलन माळवतकर यांच्या घरासमोर सुरू होते.

पाण्याचा प्रश्न असताना वॉर्डाच्या जवळच राहणार्‍या नगरसेविका शोभा वळसे यांच्या घरावर अथवा थेट एन च्या पाण्याच्या टाकीवर मोर्चा काढण्याऐवजी माजी नगरसेवकाच्या घरावर मोर्चा नेण्यात आल्याने त्यामागील राजकीय हेतू समोर आला. या मोर्चानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वॉर्डात पाणीपुरवठा सुरू झाला. मागील चार दिवसांपासून श्रीकृष्णनगरसह सिडको हडकोत पाण्याचे वेळापत्रक पुरते विस्कळीत झाले असून ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. अनेकदा नळाला पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.