आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, Congress And Ncp Party Issue At Aurangabad

काँग्रेसच्या मतदारसंघासाठीही राष्ट्रवादीचे इच्छुक मुलाखतीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही सोपस्कर पूर्ण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मुंबईत इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या असून मंगळवारी जिल्ह्यातील विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती होतील. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला मध्य आणि पैठण हे दोनच मतदारसंघ आहेत, पण जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होतील, असे जिल्हाध्यक्ष सुधाकर साेनवणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इच्छुकांनी पाण्या-पावसात वेळेत पोहोचता यावे यासाठी सोमवारी दुपारीच मुंबईकडे कूच केल्याचे समजते. पैठण मतदारसंघात विद्यमान आमदार असल्यामुळे तेथून त्यांच्याखेरीज अन्य कोण दावा करते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शहरातील पश्चिम मतदारसंघ हा आरक्षित आहे तर पूर्व काँग्रेसकडे आहे. त्यामुळे बहुतांश इच्छुकांची नजर राष्ट्रवादीकडे असलेल्या मध्य मतदारसंघावर आहे. गतवेळी राष्ट्रवादीचे कदीर मौलाना अपक्ष प्रदीप जैस्वाल यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यांचाही या वेळी दावा असला तरी इच्छुकांच्या यादीने चाळिशीचा आकडा गाठल्याचे समजते. नेमके किती जण मुलाखतीसाठी जात आहेत, याची माहिती कोणत्याच पदाधिकाऱ्याला नाही. मुलाखती झाल्यानंतर सर्व समजेलच, असे सांगून प्रत्येकाने वेळ मारून नेली. सोनवणे हेही मध्यमधून इच्छुक असून त्यासाठी ते सोमवारीच मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरे स्पर्धक तथा शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, गतवेळचे उमेदवार कदीर मौलाना ही मंडळीही समर्थकांसह मुंबईत पोहोचली आहे. राष्ट्रवादी भवनात दुपारी चार वाजता मुलाखती होणार असून त्याची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याला देण्यात आली आहे. आघाडी नाही झाली तर काॅंग्रेसच्या मतदारसंघातही उमेदवार तयार पािहजे म्हणून सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती पक्षनेत्यांकडून घेतल्या जण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
फौजियांच्या उमेदवारीचे काय ?
राज्यमंत्री फौजिया खान यांनीही मध्य मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे उद्या त्या मुलाखतीला येतात की नाही, यावरून बरेच चित्र स्पष्ट होणार आहे. शहरातील कोणालाही उमेदवारी द्या, पण बाहेरचा नको म्हणत राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. पक्षाने आदेश दिला तर लढेन, असे त्या म्हणाल्या होत्या.
सर्वांच्या मुलाखती होतील
*जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मतदारसंघ कोणता याचा विचार नंतर होणार असून कोण-कोण मुलाखती देणार हे नंतरच स्पष्ट होईल.'' सुधाकर सोनवणे, िजल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.