आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलूखमैदानी तोफा थंडावल्या; छुप्या प्रचारावर नजर, ४६ मतदारसंघांत कमालीची अटीतटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. आता छुप्या प्रचारावर प्रशासनाची करडी नजर आहे. मराठवाड्यातील ४६ जागांवर कधी नव्हे, प्रथमच बहुरंगी आणि अटीतटीचा सामना रंगणार आहे. भल्याभल्यांचे अंदाज चुकवणारी निवडणूक असल्याचे चित्र सध्या तरी आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेही सर्व ताकदीनिशी मैदानात उतरली आहे.
बीड : सहाही मतदारसंघांसह लोकसभा पोटनिवडणूक रंगतदार
बीड | लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस उमेदवारामुळे रंगतदार झाली तर विधानसभेच्या सहाही मतदारसंघांत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी या पक्षांच्या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे. बीड विधानसभेत राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर, भाजपचे विनायक मेटे आणि शिवसेनेचे अनिल जगताप यांच्यात सामना आहे. गेवराईत राष्ट्रवादीचे बदामराव पंडित विरुद्ध भाजपचे लक्ष्मण पवार, माजलगावात राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके विरुद्ध भाजपचे आर. टी. देशमुख, परळीत भाजपच्या पंकजा मुंडे - राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यात लढत आहे.
नांदेड : प्रचाराचा रोख विरोधकांच्या वस्त्रहरणावरच
नांदेड | जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. बहुतेक पक्षांनी शहराच्या विविध भागांत रॅली काढून प्रचाराची सांगता केली. जिल्ह्यातील मुखेड, भोकर या मतदारसंघांचा अपवाद वगळता उर्वरित मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी सामने होण्याची शक्यता आहे. एकूण १६४ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारात या वेळी फारसे मुद्दे चर्चिले गेले नाहीत. बहुतांश प्रचाराचा रोख विरोधकांच्या वस्त्रहरणावरच होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा जिल्हा असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली : अंदाज बांधणे अवघड, सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला
हिंगोली | जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघांत चौरंगी लढती होत आहेत. याशिवाय मनसे, बसपा, बहुजन महासंघ, कम्युनिस्ट हे पक्षही आपली व्होट बँक कायम ठेवण्यासाठी परिश्रम करीत आहेत. यामुळे निश्चित कोणता उमेदवार निवडून येणार याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. कळमनुरीमध्ये १२ तर हिंगोलीत सर्वात जास्त १९ उमेदवार आखाड्यात आहेत. वसमतमध्ये १२ उमेदवार रिंगणात आहेत. तिन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.