आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Team Special Watch On Sillod And Bhokardan City

मध्य, सिल्लोड, भोकरदनच्या मतदारांवर आयोगाची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकाच जिल्ह्यात पण एकापेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात नावे असलेल्या एक लाख मतदारांवर आयोगाची मतदानादरम्यान खास नजर असणार आहे. या मतदारांना केवळ एकाच ओळखपत्रावर मतदान करता येणार नाही, तर दुसरे ओळखपत्रही द्यावे लागेल. ओळखीचा दुसरा पुरावा नसेल तर त्यांना मतदानापासून रोखले जाऊ शकते. औरंगाबाद मध्य, सिल्लोड आणि नजीकचे भोकरदन असे तीन मतदारसंघ मिळून अशा मतदारांची संख्या एक लाखाच्याही पुढे जाते. त्या सर्वांवर आयोगाची नजर असेल.

दीड महिन्यापूर्वी मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार मध्य मतदारसंघात नावे असलेले ४० हजार मतदार सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील यादीत समाविष्ट आहेत. काहींची नावे तसेच वयही सारखेच आहेत. त्यामुळे ही नोंदणी मुद्दाम केली असल्याचे त्यांचे म्हणणे होते. दोन्हीही याद्यांत नावे असलेल्यांची नावे एका यादीतून वगळावी, अशी त्यांची मागणी होती, परंतु पुराव्यांसह नोंद केली असेल तर अशी नावे वगळली जाणार नाहीत, अशी भूमिका आयोगाने घेतली.

आयोग काय करेल? : या मतदारांची नावे एका यादीतून वगळली जाणार नाहीत. मात्र, अशा मतदारांची वेगळी यादी तयार करून ती दोन्हीही विधानसभा मतदारसंघांतील केंद्रांवर पोहोचती होणार आहे. तेथे संबंधित मतदार मतदानासाठी आला तर त्याला केवळ एका ओळखपत्रावर मतदान करता येणार नाही. मतदान ओळखपत्राशिवाय आधार किंवा अन्य एखादे ओळखपत्र देणे क्रमप्राप्त असेल. असे ओळखपत्र त्याने दिले नाही तर त्याला मतदानापासून रोखण्याचे अधिकार मतदान केंद्रप्रमुखाला असणार आहेत.

माझ्या मतदारसंघात ४० अब्दुल सत्तार
मध्य मतदारसंघातील ४० हजार नावे सिल्लोड मतदारसंघाच्या यादीत आहेत. त्यामुळे दोन्हीकडे मुद्दाम नोंदणी केल्याचा जैस्वाल यांचा आरोप आहे, तर अब्दुल सत्तार नावाचे माझ्या मतदारसंघात ४० मतदार आहेत, असा युक्तिवाद आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. नावात साम्य असू शकते, पण ४० ते ५० हजार नावे सारखीच कशी,असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनाही पडला आहे. यातील बरीच नावे सारखी दिसत असली तर बहुतांश ठिकाणी वयात बदल आहे. त्यामुळे थेट नावे वगळणे टाळून त्यांनी मतदानादरम्यान काळजी घेण्याचे ठरले आहे.

भोकरदनचाही समावेश
जैस्वाल यांच्या तक्रारीमुळे सिल्लोड आणि मध्य मतदारसंघातील गडबड समोर आली. मात्र, त्यानंतर सिल्लोड व भोकरदन मतदारसंघातही असाच प्रकार असल्याची तक्रार समोर आल्याने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली. तेथेही वरील खबरदारी घेतली जाणार आहे. भोकरदन मतदारसंघातील ६० हजारांवर मतदार सिल्लोड तसेच मध्य मतदारसंघात मतदार आहेत.

आयोगानेच शोध घ्यावा
दोन विधानसभा मतदारसंघांत ४० हजार मतदार सारख्याच नावाचे असल्याचे मलाही नवल वाटले. माझ्याच नावाचे ४० जण माझ्या मतदारसंघात आहेत, पण ४० हजार जण एकाच नावाचे कसे, हे आयोगाने शोधावे. नाव एकाच यादीत राहील, याची खबरदारी घ्यावी. अब्दुल सत्तार, मंत्री तथा आमदार, सिल्लोड.

नियोजितपणे कट
मला वाटते, यामागे षड््यंत्र आहे. याची चौकशी होऊन फक्त एकाच ठिकाणी मतदारांची नावे असायला हवीत. एकाच जिल्ह्यात ४० हजारांवर नावे सारखीच असू शकत नाहीत. अपवाद असतो, पण एवढा नाही. नियोजितपणे केलेला हा कट असल्याची माझी तक्रार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे नोंदवणाऱ्यांवर कारवाई व्हावी. प्रदीप जैस्वाल, तक्रारदार आमदार.

ओळखीसाठी लागतील दोन पुरावे
एकाच नावाच्या व्यक्तीची नावे यादीतून वगळणार नाहीत. मतदान केंद्रांवर अशा मतदारांची यादी पोहोचती केली जाईल. तो मतदार मतदानासाठी आल्यानंतर त्याला ओळखीचे दोन पुरावे द्यावे लागतील. विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.