आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुर्दंड: पावणेदोन लाख ग्राहकांना बसतो वेळेत बिल न भरल्याचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वीज ग्राहकांनी वेळेत वीज बिलाचा भरणा केला तर दहा ते पंधरा रुपयांपर्यंत सूट मिळते. पण 2 लाख 48 हजार 188 वीज ग्राहकांपैकी केवळ 70 हजार वीज ग्राहक वेळेवर बिल भरतात, तर 1 लाख 78 हजार 188 वीज ग्राहक वेळेवर बिल भरत नसल्याने त्यांना व्याजसह थकीत रकमेचा भरणा करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या खिशाला अधिकचा भुर्दंड बसत असून, कंपनीला मात्र फायदा होत आहे.

एका ग्राहकाच्या दारापर्यंत वीज पोहोचवण्यासाठी प्रतियुनिट 5.56 पैसे खर्च येतो. मात्र घरगुती वीज 0 ते 100 युनिटसाठी केवळ 3.39 पैसे प्रतियुनिटप्रमाणे वीज बिल आकारण्यात येते. वेळेवर वीज बिल भरणार्‍या ग्राहकांना दहा ते पंधरा रुपये सूट देण्यात येते. तरीदेखील पावणेदोन लाख वीज ग्राहक वेळेवर वीज बिल भरत नसल्याचे जीटीएलने दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

का भरावे वेळेत वीज बिल
विजेचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त आहे. ग्राहकांना वेळेत बिल भरण्याची सवय लागावी यासाठी 10 ते 15 रुपये सूट देण्यात येते. त्याचा फायदा घेण्यासाठी बिल वेळेत भरणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ग्राहकांना याबाबत माहितीच नाही. कंपनीच्या वतीने जनजागृती केली जात नाही. वेळेवर बिल दिले जात नसल्याने शहरात पावणेदोन लाख ग्राहक वेळेवर वीज बिल भरत नसल्याचे विदारक चित्र आहे. ग्राहकांना दहा रुपये दंडाप्रमाणे थकीत रकमेचा भरणा करावा लागतो.

वीज बिल वितरणाची व्यवस्था अशी
जीटीएल स्वत: ग्राहकांना घरपोच वीज बिल वितरण करते. यासाठी सर्कलनिहाय 250 कर्मचारी नेमले आहेत. 360 पेक्षा अधिक संगणक प्रणालीवर ग्राहकांचा डाटा तयार करून बिल वितरित होते. 58 केंद्रे, 8 उपकेंद्रे आणि 2 वीज ग्राहक सेवा केंद्रांत ग्राहक वीज बिलाचा भरणा करू शकतात. याचबरोबर संगणकावर वीज बिल उपलब्ध आहे. जीटीएलचे एकूण 2 लाख 48 हजार 188 ग्राहक आहेत. यापैकी 88 हजार 573 घगुती, 1609 औद्योगिक आणि 11 हजार वाणिज्य ग्राहकांनी सहा महिन्यांपासून वीज बिलाचा भरणा केलेला नाही. त्यांच्याकडे जवळपास सात कोटींची थकबाकी असावी. 70 हजार ग्राहक नियमित वीज बिल भरतात, अशी माहिती जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी दिली आहे.

आम्हाला सूट मिळत नाही
वेळेवर वीज बिल भरतो, पण आम्हाला कधी वीज बिलात सूट मिळालेली नाही. वेळेवर वीज बिलाचा भरणा केला असता दहा ते पंधरा रुपये सूट मिळते याबाबत माहितीही नव्हती. तुम्ही सांगितले म्हणून माहीत झाले.जीटीएलला याबाबत विचारणा केली जाईल.
-आत्माराम शिंदे, ग्राहक, चौधरी कॉलनी, चिकलठाणा

पंधरा रुपये सूट मिळते
नियमित 500 ते 600 रुपये वीज बिल भरतो. पण वेळेवर वीज बिल भरले तर दहा ते पंधरा रुपये सूट मिळते याची मला माहिती नाही.
-बी. एन. सानप, ग्राहक, एन 2

जनजागृती आवश्यक
माझ्यासारख्या 60 टक्के वीज ग्राहकांना याबाबत माहिती नसावी. त्यामुळे वीज बिल भरण्यात चालढकलपणा होतो. याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत, त्याविषयी कंपनीने माहिती दडवून ठेवू नये.
-जयाजी सूर्यवंशी, ग्राहक

सर्वसामान्यांना बसतो फटका
मीटर कार्ड लावावे. रीडिंग घेतल्याची आणि बिल दिल्याची नोंद घेतली जावी. चुकीचे रीडिंग व सात दिवसांच्या आत वीज बिल भरणा केल्याचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. सर्वसामान्य ग्राहकांना याबाबत माहिती नसल्याने त्यांना मोठा फटका बसतो.
-हेमंत कापडिया, सदस्य, वीज नियामक आयोग