आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधगिरीने विजेची उपकरणे वापरली तर अपघात टळणे शक्य : हरिभाऊ बागडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : वीजवापर ही आता अत्यावश्यक बाब बनली आहे. विविध क्षेत्रांत झालेली प्रगती, स्वयंपूर्णता ही विजेमुळेच शक्य झाली आहे. अशा या उपकारक विजेचा वापर मात्र अत्यंत काळजीपूर्वक, पूर्ण सावधगिरी बाळगून आणि जाणतेपणाने करणे गरजेचे आहे.
 
थोडेसे दुर्लक्ष आणि अज्ञान यामुळे वीज अपघात होतात. विजेचे कार्य नेमके कसे चालते हे समजावून घेतले आणि सावधगिरीने विजेची उपकरणे वापरली तर होणारे अनेक अपघात टाळता येतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. 
 
राज्य शासनाचा उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातर्फे आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन बुधवार, ११ जानेवारी रोजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या भानुदासराव चव्हाण सभागृहात झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
या वेळी महापौर भगवान घडामोडे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव बिपिन श्रीमाळी, मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, पारेषणचे मुख्य अभियंता गणपत मुंढे, अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाचे विनय नागदेव आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते “विद्युत सुरक्षा संदेश’ या पुस्तिकेचे आणि ‘विद्युत तरंग’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 
 
विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, डोळ्यांना दिसणाऱ्या विजेमुळे होणारे अपघात टाळण्याकरिता प्रत्येक नागरिकाने विजेसंदर्भात पुरेशी माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्युत कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि अपघात विमा यासंदर्भात शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली. अपघात टाळण्याबरोबरच वीज बचतीवरही त्यांनी भर दिला. 
 
या सप्ताहाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून या सप्ताहानिमित्ताने सुरू झालेली प्रक्रिया यापुढेही सतत सुरू राहायला हवी, असे त्यांनी सांगितले. श्रीमाळ म्हणाले, हा सप्ताह म्हणजे एक जनप्रबोधनाच्या चळवळीचा प्रारंभ आहे. विजेचा वापर योग्य प्रकारे, सुरक्षिततेने होणे ही सवय बनली पाहिजे. 
 
या सप्ताहादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमात विद्युत सुरक्षितता या उपक्रमांतर्गत विना अपघात कार्य केलेल्या विविध व्यक्ती, संस्थांचा, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
 
या सप्ताहाचा समारोप १७ जानेवारी रोजी पुणे येथे होणार आहे. याप्रसंगी उपस्थितांना विजेचा सुरक्षित आणि योग्य वापराबाबत प्रतिज्ञा देण्यात आली. विशाखा रूपल यांनी सूत्रसंचालन केले, तर विनोद शहाणे यांनी आभार मानले. 
 
वीज सुरक्षितता लोकचळवळ व्हावी: घडामोडे 
महापौर भगवान घडामोडे यांनी वीज वापरासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि त्यासाठी असलेल्या अनेकविध कायद्यांचा उल्लेख करून विजेचा योग्य वापर आणि सुरक्षितता ही लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्युत सुरक्षेसंदर्भात शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये कार्यक्रम घेण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.