आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरावरून 33 के.व्ही. उच्च् दाबाच्या विद्युत तारा हटवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 4 वानखेडेनगर, एन - 13 अंतर्गत जटवाडा रोडवरील होनाजीनगर, रामेश्वरनगरी परिसरातील नागरिकांच्या घरावरून 33 के.व्ही. उच्च दाबाच्या विद्युत तारा गेल्या आहेत. अवघ्या दहा ते पंधरा फुटांवर या विद्युत वाहिन्या असल्याने नागरिकांना वरच्या मजल्याचे बांधकाम करता येत नसून जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात जीटीएल कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

जटवाडा रोडवरील सारा वैभव पाठीमागील ही वसाहत असून 20 वर्षांपूर्वी विजेच्या तारा टाकण्यात आल्या आहेत. महादेव मंदिरापासून ते संभाजी अतकरे यांच्या अपार्टमेंटपर्यंत भूमिगत उच्च दाबाची विद्युतवाहिनी टाकण्यात आलेली आहे. मात्र समोरील काही घरांवरून अवघ्या दहा ते पंधरा फुटांवर या विद्युत तारा गेल्यामुळे बांधकाम होत नाही. याबरोबरच जीविताला धोका निर्माण झाला आहे. या वसाहतीत शंभरहून अधिक घरे आहेत. मात्र काही घरांवर विद्युत तारा गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. उच्च दाबाच्या विद्युत तारा हटवण्यासंदर्भात नागरिकांनी जीटीएल कार्यालयाकडे निवेदन सादर केलेले आहे. परंतु त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यामुळे या समस्या सोडविणार कोण, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. उच्च दाबाच्या विद्युत तारा काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी सुभाष नाडे, अरुण मुळजकर, विष्णू मोरे, विजय पवार, अनिल जवळकर, जी.एस. सिरसाट आदींनी केली आहे.
उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे जीविताला धोका
मागील दहा वर्षांपासून या गंभीर प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही. बांधकाम करता येत नसून उच्च् दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे जीविताला धोका निर्माण झाला आहे.
सुभाष नाडे, रहिवासी
महादेव मंदिरापासून भूमिगत विद्युत तारा टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र आमच्या घरांवरून या तारा गेल्यामुळे धोका वाढला आहे. स्पार्किंग होऊन अनुचित प्रकार घडू शकतो. या तारा हटवण्यात याव्यात.

अरुण मुळजकर, रहिवासी
जीटीएल कार्यालयाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. परंतु तारा हटवण्यात येत नाहीत. आमच्या जीविताला धोका असताना जीटीएलने याकडे लक्ष घालावे.
विष्णू मोरे, रहिवासी