आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिल भरण्यासाठी रांगा; ग्राहकांची गैरसोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दूधडेअरीजवळील महावितरणच्या कार्यालयात बुधवारी वीज बिलाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एटीपीवर तसेच कर्मचाऱ्यांकडून बिल भरणा करून घेतला जात असतानाही ग्राहकांना एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागले. यामुळे ग्राहकांचा मोठा वेळ वाया गेला. ज्येष्ठ नागरिकांना तर अधिक त्रास सहन करावा लागला. महावितरण सेवा देण्यास कमी पडत असल्याने अशा प्रकारे हेळसांड होत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

वीज ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करतेवेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरणने एटीपी मशीनद्वारे २४ तास वीज बिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. एटीपी मशीन हाताळणी सर्वच ग्राहकांना येत नाही. तसेच एटीपी मशीनही अल्प आहेत. ज्यांना एटीपीची थोडीफार माहिती आहे अशा ग्राहकांनाही वीज बिल भरण्यासाठी दीड तास ताटकळावे लागत आहे. याकडे महावितरणने लक्ष देऊन ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी संतोष दरक, के. के. निकाळजे, मनीलाल पटेल, अँथोनी यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना केली.
वीजबिलही मिळाले नाही
वीजग्राहकांना एकाच वेळी महिन्याच्या २४ तारखेला वीज बिलांचे वितरण केले जाईल, अशी ग्वाही मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी जिल्हा विद्युतीकरण समितीच्या ९६ व्या बैठकीत दिली होती. मात्र प्रत्यक्षात वीज ग्राहकांना दोन महिन्यांपासून वीज बिले मिळाली नाहीत. अनेक जण वीज बिलाच्या प्रतीक्षेत आहेत. अँथोनी यांनी १७ डिसेंबर रोजी संगणकावरून वीज बिलाची प्रत मिळवून ते बिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे होते.
-नियमित वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना योग्य सेवा सुविधा मिळत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांना तास दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. याकडे महावितरण प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे. अतिरिक्त भाराची रक्कम अवाजवी आहे. त्याची चौकशी करावी. वीज बिल वेळेत द्यावे. संतोषदरक, वीजग्राहक, बसैयेनगर.
चांगली सेवा देण्यास कटिबद्ध
-ग्राहकांचीगैरसोय होऊ नये, यासाठी ऑनलाइन सेवेबरोबरच सात एटीपी मशीन बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तीन ठिकाणी एटीपी मशीन बसवल्या आहेत. २३ कॅश सेंटर सुरू केली आहेत. एकाच ठिकाणी वीज ग्राहकांनी गर्दी करू नये. वीज बिलेही नियमित दिली जात आहेत. ज्यांना वीज बिल मिळाले नाही त्यांनी तक्रार करावी. त्वरित दखल घेतली जाईल. अतिरिक्त भार नियमाप्रमाणेच लावला आहे. तो अवाजवी असल्याची तक्रारही आली नाही. ग्राहकांना चांगली सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. शंकरशिंदे, मुख्यअभियंता.