आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांपासून वीज बिल मिळेना ग्राहकांना विलंब शुल्काचा भुर्दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी,अंबिकानगरातील बहुतांश वीज ग्राहकांना गत दोन महिन्यांपासून वीज बिल मिळाले नसल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्राहकांना व्याज, विलंब शुल्क आणि थकबाकी वाढीचा भुर्दंड सोसावा लागणार असून वेळेत वीज बिल भरल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीलाही मुकावे लागणार आहे.
ग्राहकांना वेळेत वीज बिल देणे बंधनकारक आहे, याचा महावितरणला विसर पडला आहे. काही ग्राहकांनी चिकलठाणा महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, वीज बिल वितरण करणारी एजन्सी बदलल्यामुळे बिल देण्यास विलंब होत असल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी दिली. तुमच्या दोषामुळे आम्हाला का अडचणीत आणता, असा प्रश्न गणेश घोगरे आणि सतीश इखे यांनी केला.

सहायक अभियंता अनभिज्ञ : वीजबिल मिळाले नसल्याने अंबिकानगरातील ग्राहक अचंबित झाले आहेत. याबाबत महावितरणच्या कार्यालयात जाऊन सहायक अभियंता आर. पी. राठोड यांना विचारणा केली असता, एजन्सी बदलली आहे. पण वीज बिल मिळाले नाही, अशी एकही तक्रार आम्हाला मिळाली नाही. तुमच्या माध्यमातून मला ही माहिती कळली आहे. यासंदर्भात त्वरित चौकशी केली जाईल. खरेच वीज ग्राहकांना वीज बिल मिळाले नसेल तर ते लगेच देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वीज बिल का देत नाही?

वीजबिल भरले नाही म्हणून महावितरण सर्वसामान्य ग्राहकांचे सक्तीने वीज कनेक्शन कापते. पण आम्हाला दोन महिन्यांपासून वीज बिल का देत नाही? एकदाच तीन महिन्यांचे बिल आल्यानंतर कामगार, कष्टकरी, नोकरदारांनी तसे कसे भरावे? आमचा काही दोष नसताना विलंब शुल्क, व्याज आकारला जाईल. वेळेत बिल भरण्यानंतरच्या सवलतीसही मुकावे लागेल, हा अन्याय आहे. महावितरणची चूक आहे. यापुढे याचा विचार व्हावा,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा गणेश घोगरे इखे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिला.