आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगाव वीज केंद्रात आग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयगाव - बनोटी राज्य मार्गावरील वीज पारेषण कंपनीच्या 132 केव्ही केंद्राला शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. केंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले. जामनेर, जळगाव, औरंगाबाद, येथील अग्निशमन दलाच्या साडेचार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर केंद्रातील आग आटोक्यात आली. आगीत पारेषण कंपनीचे सव्वा कोटीचे नुकसान झाले असून 14 हजार लिटर ऑइल जळून खाक झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नसले तरी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पारेषण कंपनीचे अधीक्षक अभियंता तेजराव लव्हाळे यांनी दिले आहेत.

बनोटी मार्गावर 132 केव्हीचे पारेषण केंद्र आहे. या केंद्रातून सप्टेंबर 2012 पासून सोयगाव तालुक्यासह सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, शिवना, गोळेगाव, उंडणगाव सर्कलमधील गावांना वीजपुरवठा केला जातो. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास केंद्रातील मुख्य रोहित्राने पेट घेतला व आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. त्यानंतर शंभर ते दीडशे फुटांवर आगीचे लोळ गेले होते.

परिसरातील आमखेडा, गलवाडा गावातील नागरिकांनी हे लोळ दिसले. त्यानंतर त्यांनी केंद्राकडे धाव घेतली. त्यानंतर आग विझविण्यासाठी केंद्रातील तोकडी यंत्रणा व नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले. या घटनेबाबत जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांना माहिती देण्यात आल्यानंतर जळगाव, जामनेर येथून तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. औरंगाबाद महापालिकेचे बंबही बोलावण्यात आले होते. 50 ते 60 कर्मचार्‍यांनी चार-साडेचार तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.