आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Companies News In Marathi, Aurangabad, Divya Marathi

वीज कंपन्यांची ‘काटकसर’ची किंमत मोजतात नागरिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका वसाहतीला वीज जोडणी देण्यासाठी 14 वर्षांपूर्वी महावितरणने (तत्कालीन एमएसईबी) मारलेला शॉर्टकट एका कुटुंबाच्या जिवावर उठला आहे. या वसाहतीसाठी महावितरणने रिकाम्या प्लॉटवरून तारा नेल्या. नंतर येथे उभ्या राहिलेल्या बंगल्याला तारा खेटून गेल्याने या कुटुंबाला 10 वर्षे जीव मुठीत घेऊन काढावी लागली. आता नवीन बांधकामात या तारांचा अडथळा येतोय; पण त्या काढण्यास जीटीएल तयार नाही. कोणतीही चूक नसताना या कुटुंबाला सव्वा लाख रुपये खर्चण्याची वेळ आली आहे.


रिकाम्या प्लॉटवरून शॉर्टकट
न्यू श्रेयनगर येथे 7 प्लॉटची एक छोटी वसाहत आहे. याच्या अगदी मागील बाजूस बाबा हरदासरामनगर ही दुसरी वसाहत आहे. न्यू श्रेयनगर येथे प्लॉट क्रमांक 7 वर स्वप्निल कल्याण पारगावकर राहतात. सन 2004 पर्यंत हा प्लॉट रिकामा होता. यापूर्वी 2001 मध्ये हरदासरामनगर वसाहतीच्या वीज जोडणीसाठी त्या वेळी मुख्य रस्त्यावर लाइन आली होती. तेथून दोन खांब टाकून ही जोडणी देणे अपेक्षित होते; पण तत्कालीन एमएसईबीने पारगावकर यांच्या मोकळ्या प्लॉटवरून 11 केव्ही लाइनच्या तारा नेल्या. या प्लॉटमागे आणखी एक मोकळा प्लॉट आहे. तेथे खांब टाकून पुढील वसाहतीला वीजपुरवठा करण्यात आला. यासाठी पारगावकर यांची परवानगी न घेता एमएसईबीने परस्पर उद्योग केले.


तारांना खेटून भिंत
सन 2004 मध्ये पारगावकर येथे राहायला आले. त्या वेळी त्यांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांना बांधकाम करायचे होते. त्यांनी तारांच्या अडथळ्याची तक्रार केली. वीज मंडळाने तात्पुरते ब्रॅकेट लावून तारा दूर केल्या. बंगल्याचे बांधकाम घाबरतच करावे लागले. नंतर पारगावकर यांनी स्वत: खर्च करून या तारांना रबरी कव्हर लावले. तेव्हापासून त्यांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यांनी बंगल्याचे नवीन बांधकाम काढले आहे. यामुळे पुन्हा एकदा तारांचा अडथळा निर्माण झाला आहे. नवीन बांधकामानंतर या तारा तर व्हरंड्यावरून जात आहेत. त्यामुळे तर धोका आणखी वाढला आहे.


जीटीएलचे हात वर
या तारा बाजूला घेण्यासाठी पारगावकर जीटीएलच्या पुंडलिकनगर येथील कार्यालयात गेले. मात्र, येथे त्यांचा अर्ज घेण्याऐवजी त्यांना शपथपत्र भरून देण्यास सांगण्यात आले. तारा बाजूला घेण्यासाठी आवश्यक तो खर्च त्यांना करावा लागेल, असे त्यात नमूद होते. मात्र, वीज मंडळाच्या चुकीचा फटका मी का सहन करू, अशी विचारणा केली असता हाच नियम असल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. तारा बाजूला घेण्यासाठी दोन खांब बसवावे लागणार आहेत. त्यास सव्वा लाख रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.


चूक नसताना भुर्दंड
वीज मंडळाने प्लॉटवरून तारा नेल्या. आम्ही 10 वर्षे जीव मुठीत घेऊन काढली. आता बांधकामानंतर तर या तारा आमच्या व्हरंड्यावर आल्या आहेत. त्या हटवण्यास जीटीएल आम्हालाच पैसे मागत आहे. चूक नसताना आम्हाला भुर्दंड बसत आहे. -स्वप्निल पारगावकर, त्रस्त ग्राहक


जीटीएलने खर्च उचलावा
एखाद्याच्या संमतीशिवाय त्याच्या प्लॉटवरून तारा नेणे चूक आहे. त्या काळात कर्मचा-यांनी शॉर्टकट मारण्यासाठी हे काम केले असावे. महावितरणकडे असे काम दुरुस्त करण्यासाठी मेंटेनन्स निधीची तरतूद असते. जीव किंवा मालमत्तेला इजा होणा-या तारा, खांब महावितरण स्वत: दूर करते. जीटीएलनेही तसेच करायला हवे.
-रत्नाकर सराफ, निवृत्त अधीक्षक अभियंता, महावितरण


ग्राहकास त्रास देणार नाही
या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करावा लागेल. आमची किंवा महावितरणची चूक असेल तर त्याचा ग्राहकाला भुर्दंड बसू देणार नाही. त्यांची तक्रार का घेतली नाही, याचीही माहिती घेऊ.
-समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी, जीटीएल

पुढे वाचा प्लॉटवर महावितरणची डीपीविषयी...