आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैव बलवत्तर: अन् थोडक्यात बचावलो, सात घरांवर पडली विजेची तार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- जोरदार पाऊस सुरू असतानाच तालुक्यातील शूलिभंजन येथे ११ केव्हीच्या मुख्य वीजवाहिनीची तार तुटून काही घरांवर पडली. या प्रकाराने भयभीत झालेल्या सात कुटुंबांतील ३५ जणांनी देवाचा धावा सुरू केला. एकीकडे कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे घरावर वीजप्रवाहाने लाल झालेले पत्रे पाहून सगळेच धास्तावले. घराबाहेर पडण्यासाठी प्रत्येकाची धांदल सुरू झाली. पण सुदैवाने ताबडतोब वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे संकट दूर झाले अन् सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. गुरुवारी या घटनेबाबत माहिती देतानाही या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर भय दाटले होते.
तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून अवकाळी पाऊस सुरू झाला. रात्री बाराच्या सुमारास ११ केव्हीच्या मुख्य वीजवाहिनीची तार तुटून शूलिभंजन येथील सात घरांवर पडली. मोठा आवाज झाल्यामुळे सर्वजण जागे झाले. नेमके काय झाले ते कुणालाच कळेना. तारेच्या घर्षणाने पत्रेही लाल होऊ लागले. पत्र्यात वीजप्रवाह उतरल्याचे लक्षात येताच आरडाओरड सुरू झाली. घराबाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. यानंतर सगळे घराबाहेर पडले. घरात ओल न पसरल्यामुळे सगळे बचावले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. तेवढ्यात काही जणांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. रफिक शाह आणि निर्मळ सोळंके या दोन कर्मचाऱ्यांनी तातडीने शूलिभंजनकडे धाव घेतली.

तारा तातडीने हटवणार
या प्रकाराबाबत वीज कंपनीचे सहायक अभियंता सी. डी. कान्हेगावकर म्हणाले, या वीजवाहिनीच्या खांबावरील चिनीमातीची चिमणी उन्हामुळे तापून फुटली. त्यामुळे त्यात अडकवलेली तार तुटली. तार तुटताच काही क्षण वीजप्रवाह पत्र्यांत उतरला असावा. यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी घरावरून जाणाऱ्या तारा हटवल्या जातील.

तासभर गोंधळ
वीजपुरवठा बंद झाल्यानंतरही अनेक जण घाबरलेले होते. घरात आता वीजप्रवाह नसल्याची खात्री पटत नसल्यामुळे सर्वांनीच रात्र जागून काढली. तारेच्या घर्षणामुळे लाल झालेले पत्रे पाहून सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकाला धीर देत आधार देत होता.

अन् अंगावर शहारे
सय्यद शेर अली कादर अली, सय्यद महेमूद सय्यद कासीम, सय्यद मकसूद अली कादर अली, मयमुनिसा शेख उस्मान, मेहरुन्निसा सय्यद इब्राहिम, अस्लम अहेमद शेख यांच्यासह अन्य एका कुटुबांवर हा प्रसंग ओढवला. प्रत्येकाच्या घरात पाच ते सहा सदस्य आहेत. गुरुवारी माहिती देतानाही सर्वांच्या अंगावर शहारे येत होते.
बातम्या आणखी आहेत...