आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युततारा अडकल्या झाडांच्या फांद्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातल्या अनेक भागांत विद्युततारा झाडामध्ये अडकल्याचे चित्र सर्वच भागात पाहायला मिळत आहे. मान्सूनपूर्व तयारीमध्ये झाडांची छाटणी करणे अपेक्षित असताना अजूनही शहरातल्या अनेक भागांत विद्युततारा झाडांच्या फांद्यामध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जयहिंद कॉलनीमध्ये तर जीटीएलच्या कार्यालयासमोरच झाडामध्ये तारा अडकल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला की प्री मान्सूनची पूर्वतयारी केली जाते. यामध्ये झाडाच्या फाद्या कट करणे, लाइन सुरळीत करणे यांसह अनेक कामे केली जातात. जीटीएलने मान्सूनपूर्व तयारी केल्यानंतरही अनेक झाडामध्ये तारा अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अनेकदा या तारावर झाडे पडल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र,नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही याबाबत फारशी कारवाई केली जात नाही. निराला बाजार परिसरात जयहिंद कॉलनीमध्ये लिंबाचे झाड हे पूर्णत: विद्युत तारेवर आले आहे.

या परिसरात जवळपास सहा महिला वसतिगृह आहेत. त्यामुळे चारशे ते पाचशे युवती आणि जयहिंद कॉलनीमधले लोक याच रस्त्याने ये-जा करतात. जीटीएलच्या समोर असूनही याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातल्या नागरिकांनी या विद्युततारा मोकळ्या करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
शहरातल्या सर्मथनगर, वरद गणेश मंदिर, जयहिंद कॉलनी, पडेगाव, वीटखेडा,औरंगपुरा या भागांतही अशाच प्रकारे झाडांमध्ये तारा अडकल्या आहेत. रहदारीच्या ठिकाणीच ही झाडे असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कार्यवाही होणे गरजेच असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जयहिंद कॉलनीमध्ये तर झाड तारावर इतक्या मोठय़ा प्रमाणात आले की, तारदेखील दिसत नाही.

जीटीएल कार्यालयासमोरच हे असल्यामुळे तो काढण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला नाही. मात्र, अजूनही जीटीएलकडून त्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे झाड तातडीने काढण्याची मागणी या भागातले रहिवासी जीवन देशपांडे यांनी केली आहे.शहरातल्या अनेक ठिकाणी अशा तारा झाडात अडकल्यामुळे लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.