वाळूज- कृषिपंपांना वीजपुरवठा करणा-या विजेच्या तारांचे एकमेकांना घर्षण झाल्याने पडलेल्या ठिणग्यांमुळे आग लागून सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना वाळूज शिवारात सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.
वाळूज शिवारात खाम नदीच्या बाजूला लक्ष्मण जोशी यांची गट क्रमांक 87 ही शेती आहे. त्यांच्या शेतीत त्यांनी कपाशी आणि उसाचे पीक घेतलेले आहे. या शेतीतून लगतच्या शेतमळ्यातील कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी विजेच्या तारा टाकण्यात आल्या आहेत. त्यातील दक्षिण-उत्तर गेलेल्या विजेच्या तारा या उसाच्या पिकावरून गेलेल्या आहेत. या विजेच्या तारा लोंबकळलेल्या आहेत. दोन्ही विजेच्या खांबांमध्ये लोंबकळलेल्या स्थितीत असलेल्या या तारा एकमेकांना घासल्याने स्पार्किंग झाली. त्यातून ठिणग्या पडल्यामुळे उसाच्या पाचटीने पेट घेतला. उसाच्या फडात आतील बाजूने ही आग लागल्याने ती लगेच लक्षात आली नाही. त्यात वाहते वारे असल्याने पाहता-पाहता आग भडकली. त्यानंतर मात्र आगीने पूर्ण उसाच्या फडाला वेढा टाकला. त्यामुळे लगतचे शेतकरी धावूनही काही करता आले नाही. त्यामुळे तोडणीला आलेला सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला.
वीजपुरवठा खंडित
वीजतारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून उसाच्या फडाने पेट घेतला. त्यामुळे आगीचे लोळ दूरवरून दिसत असल्याने लगतच्या शेतमळ्यातील शेतकरीवर्गाने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, त्यावेळीही विजेच्या तारांमधून स्पार्किंग सुरूच होती. तेव्हा लगतचे शेतकरी सुभाष गव्हाणे यांनी महावितरणच्या वाळूज कार्यालयाशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. तेव्हा महावितरण कार्यालयाने वीजपुरवठा खंडित केला.
दीड लाख रुपयांचे नुकसान
शेतकरी जोशी यांनी लावलेले उसाचे पीक तोडणीला आलेले होते. दिवाळी सणानंतर साखर कारखान्यास ऊस दिला जाणार होता. मात्र, हातातोंडाशी आलेला घास आग लागल्याने हिरावला गेला. उसाच्या फडास आग लागल्याची माहिती वाळूज तलाठी कार्यालयास देण्यात आली होती. त्यावरून तलाठी अनिल सूर्यवंशी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.