आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electronic Vs Print Media Workshop In Aurangabad

विचारमंथन : भारत ‘टाइमबॉम्ब’वर उभा - कुमार केतकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाढत्या हिंसाचारामुळे देश एखाद्या मोठय़ा टाइमबॉम्बवर उभा असल्यासारखा आहे. मात्र हा ‘बॉम्ब’ माध्यमांनी ‘डिफ्यूज’ केला, असे प्रतिपादन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी केले. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या वतीने तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक माध्यम विरुद्ध मुद्रित माध्यम’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मंगळवारी त्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. माधव सोनटक्के होते.

व्यासपीठावर जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, आयबीएन-7 चे वरिष्ठ संपादक रवींद्र अंबेकर, मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अँड. शरदचंद्र देशपांडे, प्राचार्या डॉ. राजकुमारी गडकर यांची उपस्थिती होती.

केतकर म्हणाले की, समाजाच्या नीतिमूल्यांची सतत घसरण होत असल्यामुळे जातीय दंगली, लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. खैरलांजी हत्याकांड तसेच गुजरात दंगलीतील हिंसाचाराचे उदाहरण देऊन ते म्हणाले, देश एका मोठय़ा टाइमबॉम्बवर उभा असून त्याला माध्यमांनी ‘डिफ्यूज’करून ठेवले आहे. माध्यमांत दोष असले तरीही मागील काही घटनांमध्ये माध्यमांनी आपली भूमिका जोरकसपणे निभावली. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमांवर त्यांनी टीका केली. दिल्लीच्या घटनेतील पीडित मुलीची ओळख उघड करावी की नाही, यावर संपादकीय पानावर रकाने भरून आले. अशा घटनांमध्ये पीडितांची नावे जाहीर न करण्याचा कायदा आहे, तरीही माध्यमांनी या विषयावर पॅनल डिस्कशन केले. माध्यमांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल मार्मिक टीका करताना मुद्रित माध्यमाचे संपादक म्हणाले, अर्थसंकल्पात काय हवे आणि काय नको हे माध्यमांना चांगले माहिती असते. त्यामुळे अर्थमंत्र्यांची गरज उरली नसल्याच्या आविर्भावात माध्यमे वावरत आहेत.

माध्यमांना आता उद्योगांचा दर्जा !
माध्यमांनी आता उद्योगांचा दर्जा प्राप्त केला आहे. बातमी ही जाहिरात होत असून जाहिरातीलाच बातमीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे सांगत डॉ. गव्हाणे यांनी पेड न्यूजच्या वाढत्या प्रचलनावर टीका केली. जगात मीडियाचा बिझनेस झाला असून इंटरटेनमेंट अँड मीडिया इंडस्ट्रीज (ई अँड एम इंडस्ट्रीज) असे स्वरूप त्याला आले आहे. अमेरिकेत सर्वाधिक 363 बिलियन डॉलर्सचा व्यवसाय आहे. 2016 मध्ये त्यांचा व्यवसाय 490 बिलियन डॉलर्सपर्यंत जाणार आहे. जगातील यादीत भारताचा क्रमांक 14 वा असून 2011 पर्यंत 86 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होता. 2016 मध्ये हाच व्यवसाय 1 लाख 76 हजार कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. अंबेकर यांनीही या वेळी भाषण केले. प्रास्ताविक डॉ. गडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. यशोधरा दाभाडे-शर्मा यांनी केले.

(छायाचित्र :चर्चासत्रात मार्गदर्शन करताना (उजवीकडून) संपादक कुमार केतकर, प्राचार्या डॉ. राजकुमारी गडकर, हिंदी विभागप्रमुख डॉ. माधव सोनटक्के, प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, आयबीएन-7 चे वरिष्ठ संपादक रवींद्र अंबेकर, अँड. शरदचंद्र देशपांडे.)