आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ महोत्सव यंदा थाटात होणार; प्रशासनाकडून आतापासूनच तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अलीकडच्या काळात औरंगाबादची खास ओळख ठरलेला वेरूळ महोत्सव यंदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. गतवर्षी मराठवाड्यात दुष्काळाची छाया असल्याने हा महोत्सव होऊ शकला नव्हता. यंदा वातावरण चांगले असल्यामुळे हा महोत्सव होणारच, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले असून त्याची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या महोत्सवासाठी प्रशासकीय तरतूद अवघी पाच लाख रुपये आहे. मात्र, होणारा खर्च किमान एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे प्रायोजक शोधण्याबरोबरच मान्यवर कलावंतांच्या तारखा मिळवण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यामुळेच या महोत्सवाची तयारी आतापासून सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर जावे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवात फक्त कलावंतच बाहेरचे येतात व सर्व प्रेक्षक मात्र औरंगाबादकर असतात. त्यामुळे शहराचे मार्केटिंग करण्याचा उद्देश सफल होतो आहे की नाही याचा प्रशासन विचार करत आहे. म्हणूनच या वेळी कलावंतांबरोबरच प्रेक्षकही बाहेरच्या देशांतील असावेत यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र तसे शक्य न झाल्यास महोत्सव आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत यावर विचारविनिमय होईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.