आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणादण आरक्षणे उडवली, मात्र मूलभूत सुविधांचा विसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहानूरवाडी,मुस्तफाबाद, सातारा परिसर, इटखेडा, कांचनवाडी नक्षत्रवाडी या सेक्टरमध्ये येणाऱ्या परिसरात नगररचना विभागाने ईएलयूमध्ये (जमिनीच्या विद्यमान वापराचा नकाशा) दाखवलेली आरक्षणे पालिका पदाधिकाऱ्यांनी दणादण कमी केली. मात्र, असे करताना ती अन्यत्र टाकणे गरजेचे असल्याचाही विसर या मंडळींना पडला. यामुळे या परिसरात मूलभूत सुविधा द्यायच्या कशा, याचा विचार पालिका पदाधिकाऱ्यांनी केला नसल्याचे समोर आले.
पैठण रस्त्यालगतच्या या परिसराचा विचार केला असता येथे शाळा, रुग्णालय, सार्वजिनक शौचालय यासाठी जागाच ठेवण्यात आली नसल्याचे सर्वसाधारण सभेने दुरुस्त्या केलेला नकाशा जाहीर झाल्यानंतर समोर आले. त्यामुळे भविष्यात येथील लोकसंख्येला आवश्यक ती मैदाने, उद्याने, शाळा, रुग्णालये, बसस्थानक येथे होणारच नाहीत, हेही नकाशावर नजर टाकल्यानंतर दिसून येते.

अधिकृत लेआऊटवर आरक्षण : एमआयटीमहाविद्यालयासमोर गट नंबर ७० ७१ (पार्टली) येथे पालिकेने १.३८ हेक्टर जागेवर २००२ मध्ये अधिकृत लेआऊटला मंजुरी दिली. तेथे दवाखाना उभारण्यासाठी पालिकेने रीतसर बांधकाम परवानगीही दिली. तेथे आता दवाखान्याचे काम सुरू झाले आहे. १९९१ च्या विकास आराखड्यातही ही जागा यलो पट्ट्यात दाखवण्यात आली होती. ईएलयू तयार करताना नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली नाही. या १.३८ हेक्टरवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले. ही चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी पालिका पदाधिकाऱ्यांची होती; परंतु त्यांनीही हे आरक्षण कायम ठेवले. अर्थात, पुढे हे प्रकरण न्यायालयात जाणार हे नक्की आहे. कारण एकीकडे पालिकेने लेआऊटला मंजुरी दिली. २० लाख रुपये शुल्क भरून घेण्यात आले. नंतर तेथे बांधकाम परवानगीही दिली आणि आता त्यावर आरक्षण टाकण्यात आले. प्रत्यक्ष पाहणी तसेच पालिकेतील दस्तऐवज बघता आरक्षण टाकल्याचा हा परिणाम आहे. आधी अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही, तर नंतर पदाधिकाऱ्यांनीही तशी तसदी घेतली नाही. ही जमीन संपादनासाठी १८ कोटी ८७ लाख रुपये इतका खर्च येण्याचा अंदाजही नगररचना विभागाच्या महाशयांनी व्यक्त केला असून ही जमीन खासगी असल्याचे म्हटले आहे.

ना बस थांबा, ना रुग्णालय
रेल्वे स्टेशनपासून ते नक्षत्रवाडी गाव संपेपर्यंतच्या परिसरात एकाही ठिकाणी बस थांबा, स्थानकासाठी जागा सोडण्यात आलेली नाही. पार्किंगचीही व्यवस्था येथे नसल्याचे नकाशावर नजर टाकल्यास दिसते. या परिसरात बस थांबणारच नाही का, वाहने कोठे उभी करायची याचे उत्तर नगररचना विभागाने दिले नाही. तसेच त्यांची चूक दुरुस्त करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनीही केले नाही. आधीची आरक्षणे उठवून काही ठिकाणी सामान्य नागरिक, तर काही ठिकाणी उद्योजक, व्यावसायिकांना खुश करण्याचे काम पालिका पदाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येते.

६० मीटरचा रस्ता आला चक्क १८ मीटरवर
पैठण रोड ते गोलवाडी हा रस्ता १९९१ च्या विकास आराखड्यात ६० मीटरचा दाखवण्यात आला होता. त्यानुसार जागाही सोडण्यात आली आणि ६० मीटरचा रस्ता गृहीत धरून बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. मात्र, यंदाच्या ईएलयूमध्ये हा रस्ता अचानक १८ मीटरचा करण्यात आला. यामुळे लाख ४८ हजार चौरसमीटर जागा उपलब्ध होत असून बाजूच्या मोठ्या उद्योजकाला ही जागा देण्यासाठी रस्त्याची रुंदी कमी करण्यात आल्याची चर्चा नगररचना विभागात आहे. विशेष म्हणजे पालिका पदाधिकाऱ्यांनीही हा रस्ता १८ मीटरचाच ठेवला आहे. या रस्त्याला जोडणारे अन्य सर्व रस्ते ६० मीटरचे आहेत. मात्र, एवढाच रस्ता १८ मीटरचा का करण्यात आला, याचे उत्तर देण्यात आलेले नाही.

जागाच केली गायब
प्रशासनाने तयार केलेल्या ईएलयूमध्ये ई-४९, ५० आणि ५१ अशी तीन आरक्षणे महानुभाव आश्रम चौकाच्या पुढे ठेवण्यात आली होती. त्यात पोलिस चौकी, बसस्थानकासाठी हे आरक्षण असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु जेव्हा पालिका पदाधिकाऱ्यांनी यात दुरुस्ती केली तेव्हा वरील जागाच नकाशावरून गायब करण्यात आल्याचे दिसून येते. नकाशावर ती आरक्षणेही नाहीत तेथील जागाही नाही.