आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा वॉर्ड आरक्षणाच्या सोडतीत गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: आरक्षण सोडतीत आरक्षित वार्डांचे क्रमांक मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी दाखवले.
औरंगाबाद - औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या ११३ वॉर्डांच्या रणधुमाळीचा बिगुल शनिवारी वॉर्ड आरक्षणाच्या माध्यमातून वाजला. मनपाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणा-या सर्वपक्षीय नेत्यांना आरक्षणाने जोरदार धक्का दिला. आजच्या सोडतीदरम्यान आधीच आरक्षित वॉर्डांचा पुन्हा ड्रॉमध्ये समावेश केल्याने उपस्थितांनी त्याला आक्षेप घेतला होता.

आज सकाळी साडेदहा वाजता सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात सोडतीला प्रारंभ झाला. मनपा आयुक्त प्रकाश महाजन, उपायुक्त किशोर बोर्डे, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी जे. टी. मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही सोडत काढण्यात आली. मनपा प्रशासनाने पुरेशी तयारी न केल्याने या सोडतीदरम्यान अनेक घोळ झाले. त्यामुळे उपस्थित इच्छुक व आजी-माजी नगरसेवकांमध्ये तसेच कार्यकर्त्यांत चलबिचल झाली.

आधीच ठरवले वॉर्ड
अनुसूचित जातीचे वॉर्ड आरक्षित ठेवताना प्रत्येक वॉर्डातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी लक्षात घेऊन उतरत्या वॉर्डांच्या यादीनुसार व चक्राकार आरक्षणानुसार आयोगाने २२ वॉर्ड राखीव घोषित केले. त्यांची यादी जाहीर होताच सभागृहात तणाव निर्माण झाला. कारण त्यात अनेक बडे वॉर्ड होते. त्यातून ११ वॉर्डांची सोडत काढण्यात आली.

पहिलीच चिठ्ठी अयोध्यानगर वॉर्डाची निघाली. काशीनाथ कोकाटे यांचा पत्ता कट करणारी ही सोडत ठरली. पाठोपाठ शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या अजबनगर वॉर्डाची चिठ्ठी निघाली. नंतर मग बड्यांचे एक-एक वॉर्ड जात राहिले. या २२ पैकी ९ वॉर्ड अनुसूचित जातीच्या महिलांसाठी थेट आरक्षित झाल्याने सहा वॉर्डांच्या चिठ्ठ्यांतून दोन चिठ्ठ्या काढून अनुसूचित महिलांचे वॉर्ड आरक्षित करण्यात आले.

ओबीसीच्या सोडतीत गोंधळ
ओबीसी (महिला वगळून) प्रवर्गासाठी निवडलेल्या ४८ वॉर्डांपैकी १५ वॉर्ड सोडत पद्धतीने निवडण्यात आले व उर्वरित वॉर्डांतून ओबीसी महिलांचे वॉर्ड निवडण्याची तयारी सुरू असताना आधी आरक्षित झालेल्या वॉर्डांच्या चिठ्ठ्याही त्यात टाकण्यात आल्याने उपस्थित कार्यकर्ते भडकले. या प्रकाराला त्यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने सभागृहातील वातावरण तंग बनले. काही कार्यकर्ते स्टेजच्या दिशेने धावले, काहींनी स्टेजवर जात मोठमोठ्याने आरडाओरड करायला सुरुवात केली. यानंतर मनपा आयुक्तांनी नजरचुकीने आधीच आरक्षित झालेल्या वाॅर्डाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्याचे सांगत त्या काढून घेण्यात आल्या व जर कुणाला आक्षेप असेल तर त्यांनी आक्षेप नोंदवावे, त्याची निश्चित सुनावणी होईल, असे सांगितल्याने मग शांतता झाली. पण या गोंधळात अर्धा तास सोडतीचे काम थांबले होते.

बड्यांचे वॉर्ड गेले
सर्वसाधारण महिला गटाची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जाती महिला या वर्गवारीत बड्यांचे वॉर्ड गेल्याने कोणते वॉर्ड वाचतात व राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महिलांच्या आरक्षणाची घोषणा झाली व सारेच चित्र स्पष्ट झाले.

ती चूकच होती
ओबीसी महिलांची सोडत काढताना ओबीसीच्या यादीत आधीच आरक्षित झालेल्या वॉर्डांच्या चिठ्ठ्याही टाकण्यात आल्याने काही काळ गोंधळ उडाला. त्याबाबत उपायुक्त किशोर बोर्डे म्हणाले की, ती अनवधानाने झालेली चूक होती. त्यात कोणताही हेतू नव्हता. एकूण सगळी आरक्षण प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसारच ही प्रक्रिया करण्यात आली.

सभागृहात रंगले घोषणायुद्ध
नारेगाव वॉर्डाची चिठ्ठी दोन आरक्षणांत टाकण्यात आल्याने एका कार्यकर्त्याने गोंधळ घालत व्यासपीठावर चढायचा प्रयत्न केला. मनपाचा निषेध करीत त्या कार्यकर्त्याने आरडाओरडा सुरू केला. नंतर याच कार्यकर्त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ अशा घोषणा सुरू करताच सभागृहातून ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा सुरू झाल्या. व्यासपीठावर अधिकारी झालेला घोळ निस्तरत होते, तर खाली हे घोषणायुद्ध रंगले होते.

आक्षेपांची दखल
आरक्षणाच्या पद्धतीत बदल केल्याने आक्षेपांची संख्या अधिक असेल, त्याचे काय करणार, या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी जे. टी. मोरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक आक्षेपाबाबत सुनावणी होणारच आहे.

एकच गर्दी
आपापल्या वॉर्डाचे आरक्षण काय होते या उत्सुकतेपोटी संत तुकाराम नाट्यगृहात एकच गर्दी उसळली होती. शेजारच्या हॉलमध्ये प्रत्येक वॉर्डाचा नकाशा लावण्यात आला होता. वॉर्डात कोणता भाग येतो याची माहिती लिहून घेण्यात कार्यकर्ते मग्न होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे फलकच फाडून नेले.
बातम्या आणखी आहेत...