आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणातून ‘इर्मजन्सी पंपिंग’ सुरू

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: नाथसागरातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला अखेर धरणातील अतिरिक्त अत्यावश्यक यंत्रणेतील पंप (इर्मजन्सी पंप) कालपासून सुरू करावे लागले. हे पंप सुरू झाले असले तरी शहरात येणार्‍या पाण्यात कोणतीही कपात झालेली नाही. उपशाचे प्रमाण 145 ते 148 एमएलडी इतके आहे.
पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणाच्या आत सुमारे एक किलोमीटर असलेले हे पंप सुरू करावे लागतील, असे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने तेथे विद्युत जोडणीही करून ठेवली होती. मुख्य उपसा केंद्रात येणार्‍या पाण्याचे प्रमाण कमी होताच कालपासून अत्यावश्यक पंप सुरू करण्यात आले. मात्र त्यातून 24 तास उपसा करण्याची गरज नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य उपसा केंद्रातील पाण्याचे प्रमाण खालावल्यानंतर हे पंप सुरू करावे लागतात. दिवसातून साधारणपणे सहा ते आठ तास तेथून आठपैकी दोन पंपांद्वारे उपसा करावा लागत असल्याचे कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.
इर्मजन्सी पंपिंग म्हणजे काय?
नाथसागराच्या काठाशी पालिकेचे मुख्य उपसा केंद्र आहे. उन्हाळ्यात तेथील पाण्याची पातळी खालावते. याचा अंदाज असल्यामुळे मुख्य उपसा केंद्राबरोबरच तेथून धरणात दीड किलोमीटर आत एक अतिरिक्त उपसा केंद्र उभारण्यात आले. त्याला इर्मजन्सी उपसा केंद्र म्हणतात. धरणातील उपयुक्त साठा संपल्यानंतर मुख्य उपसा केंद्रातील पाणीपातळी कायम ठेवण्यासाठी तो सुरू करावा लागतो. मुख्य उपसा केंद्रातील पातळी कायम ठेवण्यासाठी हे केंद्र आहे. त्यातून शहराला थेट पुरवठा होत नाही. पाणीपातळी वाढली की हे केंद्र बंद करण्यात येते. धरणातील पाणीसाठा 60 टक्के असेपर्यंत हे केंद्र पाण्यातच असते.
शुक्रवारी जायकवाडीला शट डाऊन
महावितरण कंपनीतर्फे दुरुस्तीसाठी शुक्रवारी (6 जुलै) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जायकवाडी उपसा केंद्राचा पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारपाठोपाठ शनिवारीही बहुतांश शहराला पाणी मिळू शकणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे. शहराच्या सर्वच भागाला याचा फटका बसणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. मनपाच्या उपसा केंद्रासाठी असलेल्या 132 केव्ही केंद्रात दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे वितरण कंपनीने पालिकेला कळविले आहे.