आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीबी स्टार पाठपुरावा: रोहयो घोटाळ्याची चौकशी; पथक दाखल झाले गंगापुरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गंगापूर तालुक्यातील ५४ रस्ते कागदावर दाखवून रोजगार हमी योजनेमध्ये एक कोटीचा घोळ केल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चौकशी पथक गंगापुरात दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सा. बां. विभागाने संपूर्ण रेकॉर्ड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहे. यासंदर्भात डीबी स्टारनेे १८ जानेवारी रोजी ‘एक कोटीचा स्वाहाकार, पण कारवाईस मात्र सपशेल नकार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. 

तीन वर्षांच्या कालबद्ध कार्यक्रमांतर्गत रोजगार हमी योजनेची (कुशल) कामे जिल्हाभरात करण्यात आली. ३० जून २००९ रोजी या कामांना सुरुवात झाली. ही कामे २०१२ पर्यंत पूर्ण व्हायला हवी होती. मात्र, २०१४ पर्यंत त्यांची मुदत वाढवण्यात आली. याअंतर्गत गंगापूर तालुक्यामध्ये ५४ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. ही कामे केवळ कागदावर दाखवून शासनाचा निधी लाटण्यात आल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील दक्षता पथकाने चौकशी केली. मात्र, सा. बां. विभागाच्या गंगापूर उपविभागाने कोणतीही कागदपत्रे चौकशीदरम्यान उपलब्ध करून दिली नाहीत. 

नव्याने चौकशी सुरू 
स्मरणपत्रे,डीओ लेटर आणि कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतरही गंगापूर उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे उपलब्ध करून दिली नसल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित उपविभागीय अभियंता आणि सहायक अभियंत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना १४ सप्टेंबर २०१६ रोजी दिले होते. मात्र, या पत्राला आठ महिने उलटली तरीदेखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अखेर विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीमधील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पानकुरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील रोहयो विभागाचे उपअभियंता एल. व्ही. धर्मापुरीकर, शाखा अभियंता आर. एम. शंभरकर आणि सा. बां. विभागाचे शाखा अभियंता दिवेकर गंगापुरात दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

बिटवीन लाइन्स 
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम आणि जि. प. बांधकाम विभागाअंतर्गत विविध योजनांतून केली जातात. मात्र, अनेक ठिकाणी आधीच झालेले रस्ते कागदावर दाखवून त्यांचा संपूर्ण निधी लाटण्याचे प्रकार होतात. या प्रकरणामध्येही एकच रस्ता दोन योजनांतून आणि दोन यंत्रणांद्वारे करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच हे कळेल. 

आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. रस्त्यांची पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी एक महिना लागेल. कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये जर अनियमितता आढळून आल्यास आम्ही तसा अहवाल सादर करणार आहोत. ही प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- ज्ञानेश्वर पानकुरे, चौकशी अधिकारी 
 
आम्हाला याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे कोणतेच पत्र प्राप्त झालेले नाही. आम्ही यापूर्वी ५४ पैकी सात कामांची चौकशी केली होती. त्यामध्ये कोणतीच अनियमितता आढळून आली नाही. आता नव्याने चौकशी होत असल्याने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला संपूर्ण रेकॉर्ड सादर केला आहे.
- एस.आर. शेंडे, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग 
बातम्या आणखी आहेत...