आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौक मशिदीचा अतिक्रमित भाग काढण्यासाठी मुदत वाढवली; नागरिकांनी सादर केली कागदपत्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्रांतीचौक मशिदीचा बाधित भाग काढून घेण्यासाठी देण्यात आलेली दोन दिवसांची मुदत शनिवारी संपली. तरीही नगरसेवक, नागरिकांनी काही मुद्दे उपस्थित केल्याने त्यांना पुन्हा अवधी देण्यात आला. नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचे आम्ही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनीच बाधित भाग काढून घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांना मुदत देण्यात आल्याचे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांंगितले.
 
शहरात या मोहिमेला नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे. आम्हीही विश्वासात घेऊन कारवाई करतोय. काही ठिकाणी स्थानिक नागरिक स्वत:हून धार्मिक स्थळ काढून घेण्याची मागणी करत आहेत. आम्ही त्यांना तसा अवधी देऊन सहकार्य करतोय, याचा अर्थ आम्ही थांबलो असा होत नाही. अवधी देऊनही धार्मिक स्थळ काढून घेतले नाही तर मग मात्र आम्हाला कारवाई करावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. क्रांती चौक मशिदीचा बाधित भाग काढून घेण्यासाठी शनिवारपर्यंतची मुदत होती. काँग्रेस नगरसेवक अफसर खान एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांच्या नेतृत्वाखाली काही नागरिकांनी दुपारी आयुक्तांची भेट घेऊन कागदपत्रे पुढे केली. तत्कालीन पोलिस महासंचालक पी. सी. पसरिचा यांनी न्यायालयाच्या आदेशावरून क्रांती चौकातील रस्ता ७० फूट  करण्याबाबतचा अहवाल दिला होता. तो न्यायालयानेही मान्य केला होता. त्यामुळे येथे रुंदीकरण करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले.त्यामुळे येथे कारवाई करता येणार नाही, असा दावा केला. परंतु आयुक्तांनी हे सर्व मुद्दे खोडून काढले. येथील १७९७ चौरस मीटर जागा पालिकेने १९९८ मध्येच संपादित केली आहे. तसा मोबदला वक्फ मंडळाला मंजूर करण्यात आला आहे. मंडळाने मोबदला घेतला नसला तरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परिणामी १७९७ चौरस मीटर ही जागा पालिकेच्या मालकीची आहे. सार्वजनिक ठिकाणची अतिक्रमणे प्राधान्याने पाडा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारवाई करावीच लागेल. त्यापेक्षा तुम्हीच आपणहून बाधित भाग काढून घ्या, त्यासाठी आणखी अवधी मिळेल, असे आयुक्त म्हणाले.
 
रविवारी ही कारवाई : रविवारीशासकीय सुटी असली तरी कारवाई होऊ शकते. पथकाला तसे संकेत देण्यात आले आहेत. दुसरीकडे सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत पथकातील अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर असतात. त्यामुळे त्यांना सुटी दिली पाहिजे, असा मतप्रवाह आहे. मात्र, आयुक्तांना रविवारीही कारवाई अपेक्षित आहे.
 
दोन दिवसांपासून कारवाई थंडावली
दोन दिवसांपासून अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई थंडावली आहे. मनपाच्या पथकाने आठवडाभरापासून पाडापाडी सुरू केली हाेती. दररोज सरासरी सात ते दहा धार्मिक स्थळे हटवण्यात येत होती. शुक्रवारी केवळ एकच धार्मिक स्थळ हटवण्यात आले. शनिवारी एकही कारवाई झाली नाही.

अतिक्रमण काढताना पूर्वी मनपाचे पथक तयार असूनही पोलिस केवळ उभे राहत होते. पैठण गेट येथे शनिवारी मात्र वेगळेच चित्र दिसले. पोलिस तयार असताना चार तास थांबून मनपाच्या अधिकाऱ्यांनी माघार घेतली. पैठण गेट येथील दर्गा पाडण्यासाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला तीव्र विरोध झाला. शेकडो लोकांनी एकत्र येऊन पालिकेच्या पथकाला कारवाई करण्यास मनाई केली. सुरुवातीला संदल चढवण्याची मागणी केली. त्यासाठी पाच वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला.
 
नागरिकांनी घेतला पुढाकार
अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेताच पाचपूर्वीच नागरिकांनी स्वत:हून भिंत पाडण्याचे काम हाती घेतले. तेव्हा नगरसेवकांनी मध्यस्थी करत मनपा आयुक्तांना फोन करून धर्मगुरू येत असल्याने एक दिवसाची वेळ देण्याची मागणी केली. त्यानुसार एक दिवसाचा वेळ दिल्याचे सांगत सर्वांना परत बोलावले.
- नासेर कुरेशी, अश्फाक सलामी, अश्फाक कुरेशी नगरसेवक अफसर खान, मतीन शेख
 
 
धार्मिक स्थळ पाडण्यास विरोध कराल तर जाईल नगरसेवकपद
धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिका पथकाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो तसेच काही ठिकाणी नगरसेवकांकडूनही विरोध होतो. अशा नगरसेवकांवर कॅमेऱ्यांची नजर असून पथकाला विरोध करणाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केले. नगरसेवकपद रद्द करण्याची तरतूद महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमात आहे. त्यामुळे आतापर्यंत विरोध केलेल्या नगरसेवकांचे पद धोक्यात येऊ शकते.
 
अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्यापासूनच याची छायाचित्रे काढण्यात येत असून व्हिडिओ चित्रीकरणही केले जात आहे. त्यामुळे पालिका पथकाला पुरावे जमा करण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. नगरसेवकांनी विरोध केल्याचे स्पष्ट झाले तर त्यांचे नगरसेवकपद रद्द केले जाईल.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...