आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्यावरील ‘त्या’ तीन इमारती भुईसपाट करा; महापौरांचे आदेश

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: जयभवानीनगरातील नाल्यात तीन ठिकाणी बहुमजली इमारती बांधल्यामुळे सुमारे 15 हजार घरांत पाणी शिरते. हे गांभीर्य लक्षात घेत या इमारती ताबडतोब भुईसपाट करा, असे आदेश महापौर अनिता घोडेले यांनी बुधवारी दिले. गुंठेवारी भागातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.
महापौर घोडेले यांनी उपमहापौर प्रशांत देसरडा, आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, शहर अभियंता मुरलीधर सोनवणे, कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे आणि सिकंदर अली, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. बाबासाहेब उनवणे यांच्यासोबत सकाळी नागेश्वरवाडी, जयभवानीनगर आणि विष्णूनगर भागातील नाल्यांची पाहणी केल्यानंतर हे आदेश दिले. पावसाळा असला तरी या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे भापकर यांनी स्पष्ट केले.
जयभवानीनगरात शंभरावर अतिक्रमणे : भाजपचे बालाजी मुंडे नगरसेवक असलेल्या जयभवानीनगरातून वाहणार्‍या नाल्यावर किमान शंभरावर अतिक्रमणे असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी तीन इमारती तर थेट नाल्यातच बांधण्यात आल्या आहेत. त्यात एका तीन मजली इमारतीचा समावेश आहे. या इमारतींखालून पाणी वाहून जाऊच शकत नसल्यामुळे मागील सुमारे 15 हजार घरांमध्ये पाणी शिरत असल्याचे मुंडे यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. केवळ तीन बांधकामामुळे पंधरा हजार घरांत पाणी शिरत आल्याचे प्रशासनानेही मान्य केल्याने त्वरित पाडापाडीचे आदेश जागेवरच देण्यात आले.
नाल्याचा प्रवाह बदला.. : आपल्यामुळे अनेक घरांत पाणी शिरत असले तरी अतिक्रमणबहाद्दरांना त्याचे काही सोयरसूतक नसल्याचेही तसेच नगरसेवक हे त्यांचे पाठीराखे असल्याचेही स्पष्ट झाले. विष्णूनगरातील नाल्यांवरही अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे. यातील काही घरांची पथकाने पाहणी केली. तेव्हा आता आम्ही घरे सोडू शकत नाही तेव्हा अन्य ठिकाणाहून नाला वळवा, अशी मागणी काही महिलांनी केली. या वॉर्डाचे नगरसेवक संजय केणेकेर यांनी नाल्यांची रुंदी वाढविण्यापेक्षा खोली वाढवा असा सल्ला दिला.
या प्रभागात नाला रुंदीकरण मोहिमेची गरज नसल्याचे सांगतानाच नाला पात्रातील अनेक घरांकडे त्यांनी पथकाला जाऊ दिले नाही. गरिबांची घरे असल्यामुळे दुर्लक्ष करा, असेही त्यांनी सुचविले. या भागात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. गुंठेवारी भागातील या बांधकामांना अधिकृत परवानगी असण्याची शक्यता कमी आहे. तरीही उद्यापासून येथील बांधकामांची तपासणी करावी आणि अनधिकृतपणे सुरू असलेली बांधकामे रोखावीत, असेही आदेश महापौरांनी दिले.
गोठय़ाला नोटीस : नागेश्वरवाडीत नाल्याच्या काठी म्हशींचा एक बहुचर्चित गोठा आहे. त्याला आतापर्यंत अनेकवेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या गोठय़ामुळे नाल्याचे पात्र अरुंद झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. त्यामुळे या गोठय़ाला नोटीस देऊन हलविण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.
रस्ता रुंदीकरणापाठोपाठ नालेरुंदीकरण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले. आज मी प्रत्यक्ष पाहणी केली असता आपत्ती टाळायची असल्यास पावसाळा थांबण्याची प्रतीक्षा करू शकत नसल्याचे दिसले. त्यामुळे यातील काही इमारती ताबडतोब पाडण्याचे मी सांगितले असून अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी उपाययोजना करणाचे आदेश दिल्याचे महापौर अनिता घोडेले यांनी सांगितले.