आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅनॉटमध्ये 97 दुकानांचे अतिक्रमण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडकोचे हृदयस्थान म्हणून उदयास आलेल्या कॅनॉट प्लेसच्या दुर्दशेवर ‘डीबी स्टार’ने वृत्त प्रसिद्ध करताच सिडकोने येथील अतिक्रमणाची पाहणी केली. त्यात 97 छोट्या दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याचा अहवाल स्वत: सिडकोनेच तयार केला आहे; पण हे करताना बडे व्यावसायिक आणि दुकानदारांच्या अतिक्रमणाचा उल्लेखही अहवालात नाही हे विशेष. त्यातही ज्यांनी कारवाई करायची ती महापालिका मात्र हे अतिक्रमण काढण्यातही कमालीची दिरंगाई करत आहे.

दिल्ली येथील कॅनॉट मार्केटच्या धर्तीवर औरंगाबादेत कॅनॉट प्लेसची निर्मिती करण्यात आली. कॅनॉट प्लेसच्या संकल्पनेनुसार या ठिकाणी सुमारे 4 बाय 4 ची 100 दुकाने तयार करण्यात आली. पण काही दिवसांतच बेशिस्त वाहतूक, दुकानांचे अतिक्रमण आणि पार्किंगची समस्या यामुळे कॅनॉट प्लेसची पूर्ण वाताहत झाली. सुंदर आणि शिस्तबद्ध मार्केटऐवजी येथे हुल्लडबाजीच वाढली. यावर ‘डीबी स्टार’ने 7 जून रोजी ‘कॅनॉट प्लेस, नो स्पेस!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे सिडको प्रशासन कामाला लागले. सिडकोने तयार केलेल्या तपासणी अहवालात मिनी शॉपिंगमधील 129 पैकी 97 दुकानदारांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. तसा अहवालच सिडकोने तयार केला.

बड्यांची यादीच नाही
कॅनॉट प्लेसच्या मिनिशॉप, चारही बाजूंनी मोठे शॉपिंग सेंटर व हॉटेल व्यावसायिक आहेत. यातील अनेक जणांनी थेट कोपरेच गिळंकृत केले आहेत; पण याबाबतचा अहवाल मात्र सिडकोने अजून तयार केला नाही. त्यामुळे सिडकोच्या भूमिकेवरच शंका निर्माण होते. त्यामुळे फक्त छोट्या दुकानदारांवरच सिडकोचा हातोडा चालणार काय, असा सवाल केला जात आहे. कारवाई होणारच असेल, तर मोठय़ांवरही व्हावी, अशी मागणी होत आहे. बड्या शॉपिंग सेंटरचाही अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे मालमत्ता अधिकारी जी. आर. ससोटे यांनी ‘डीबी स्टार’ला सांगितले असले तरी तो केव्हा, हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.

सिडको-मनपा संयुक्त कारवाई करणार
सिडकोच्या प्रशासकीय विभागाने अतिक्रमण हटवण्याची तयारी सुरू केली आहे. 10 जून रोजी मालमत्ता अधिकारी जी. आर. ससोटे यांनी कॅनॉट परिसरातील मिनी शॉपची पाहणी केली. यात दिलेल्या अहवालात 129 दुकानांपैकी सुमारे 97दुकानदार व छोट्या व्यावसायिकांनी फुटपाथ व पाथवे रोडवर अतिक्रमण केल्याचे उघड झाले.

मनपाला पत्रव्यवहार
याचा अहवाल व अतिक्रमण हटवण्यासाठी मनपा अतिक्रमण विभागाला सिडकोचे प्रशासकीय अधिकारी पंजाबराव चव्हाण यांनी पत्रव्यवहार केला आहे. मनपा आणि सिडको मिळून अतिक्रमण हटवण्याची अंतिम टप्प्यातील तयारी करीत आहे. मात्र, महापालिकेच्या दिरंगाईमुळे अद्यापही अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू झालेले नाही.

थेट सवाल
पंजाबराव चव्हाण,
प्रशासकीय अधिकारी, सिडको
कॅनॉटमधील अतिक्रमणाबाबत काय स्थिती आहे?
-मालमत्ता अधिकार्‍यांनी अहवाल तयार केला आहे. यात अनेकांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे.
अतिक्रमण आहे मग कारवाई का होत नाही?
-सिडकोला थेट जाऊन अतिक्रमण काढण्याचे अधिकार नाही किंवा तसे साहित्य सध्या उपलब्ध नाही. आम्ही मनपाच्या अतिक्रमण विभागाची मदत घेऊन संयुक्त कारवाई लवकरच करणार आहोत.
आपल्या अहवालात सर्व मिनी शॉपिंग सेंटर आहेत. मोठय़ांचे काय?
-तसे काहीही नाही. ज्यांनी अतिक्रमण केले, अशा सर्वांवर कारवाई होणार आहे. मोठय़ा शॉपिंग सेंटरचा अहवाल दोन दिवसांत तयार करणार आहोत.
याप्रकरणी मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी बी. आर. गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात मनपाची भूमिका समजू शकली नाही.)
15 दिवसांपासून चालढकल
सिडको प्रशासनाने गेल्या 15 दिवसांपासून मनपा अतिक्रमण विभागाला रीतसर पत्र देऊन अतिक्रमणाची इत्थंभूत माहिती दिली आहे. असे असताना अद्यापही त्यावर मनपाने कुठलेच पाऊल उचलले नाही.
काय आहे अहवालात?
सिडको प्रशासनाने तयार केलेल्या अहवालात 97 व्यावसायिंकानी अतिक्रमण केल्याचे नमूद आहे. काय आहे अहवालात?
1 ते 24 पर्यंत दुकानांपैकी काही वगळता सर्वांनी पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केले आहे.
मिनीशॉप क्रमांक 24 ने पत्र्याचा शेड, साइड माजिर्नमध्ये लोखंडी टपरी व पाथवेवर टेबल- खुर्ची टाकून अतिक्रमण.
मिनीशॉप 27 ते 63 पर्यंत काही मोजकी दुकाने वगळता पत्र्याचे शेड टाकू न अतिक्रमण.
शॉप 66, 67, 68, 71 मध्ये पत्र्याचे शेड, पाथवेवर टेबल-खुर्ची टाकून हॉटेलचा व्यवसाय.
शॉप क्रमांक 87 मध्ये 2 बाय 6 चे अतिक्रमण करून शटर लावले आहे.
तसेच मुख्य शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या शिवाज फुटपाथवर टेबल-खुर्ची टाकून हॉटेल व्यवसाय व फुटपाथवर महादेवाची मूर्ती बसवलेली आहे.