आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात हटणार जळगाव रोडवरील सर्व अतिक्रमणे, 2 एकर जागा होणार मोकळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - १९७५ला औरंगाबादेत चिकलठाणा येथे औद्योगिक वसाहत उभी राहिली त्याचबरोबर कामगारांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. नेमक्या त्याच कालखंडात गरवारे कंपनीला लागून आंबेडकरनगर ही नागरी वसाहत डीएमआयसीच्या जागेवर अतिक्रमण करून उभी झाली.
 
सिडकोची स्थापना होत असताना तेथून जळगाव रोड गेला. मात्र, तेव्हापासून त्यावरील अतिक्रमण कायम होते. २०० फुटांचा हा रोड एका बाजूने फक्त ३० ते ३५ फूट एवढाच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता या रस्त्याचे काम करणार असून त्यांनी येथील अतिक्रमण हटवण्याची सूचना केली आहे. ही निवासी वसाहत असल्याने पावसाळ्यापूर्वीच तेथील अतिक्रमणे हटवावे लागेल. त्यानुसार पालिका प्रशासन तयारीला लागले असून महिनाभरात रुंदीकरण झालेले असेल, असे पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
हा रस्ता झाला मोकळा  
जळगावरोडच्या दक्षिणेला सिडको तसेच हडकोची वसाहत आहे. सिडकोने नियोजन करतानाच या बाजूने रस्ता १०० फूट ठेवला होता. काही दिवसांपूर्वी पालिकेने हर्सूल टी पॉइंट ते जाधववाडी येथील अतिक्रमण काढून हा रस्ता १०० फूट केला. जाधववाडी ते आंबेडकर चौक येथे मोकळी जागा आहे. त्यामुळे तेथे अतिक्रमण हटवण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे उत्तर बाजूचा रस्ता टी पॉइंट ते आंबेडकर चौकापर्यंत मोकळा झाला आहे.
 
फक्त आंबेडकर चौक ते गरवारेपर्यंत बांधकामे आहेत. पुढे काही कंपन्यांनी संरक्षण भिंती बांधल्या असल्या तरी त्या तुम्ही सांगा आम्ही काढून घेतो, असे पालिकेला कळवले आहे. त्यामुळे आंबेडकर चौक ते गरवारेपर्यंतच्या ४०० फुटांपर्यंतची तेवढी अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत. नगररचना विभागाने दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमण हटवल्यास एकर एवढ्या आकाराची जागा मोकळी होईल.

पालिकेच्या नगररचना विभागाने हा रस्ता उत्तर बाजूने १०० फुटांचा करता यावा यासाठी गत महिन्यातच मार्किंग केले आहे. त्यामुळे कोणाचे किती घर जाणार याची कल्पना रहिवाशांना आली आहे. नगर रचना विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात काहींची पूर्ण घरे जातात तर काहींच्या मालमत्ता १० फुटांपर्यंत जातात. पूर्वी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या या भागात तीन ते चार मजल्यांपर्यंत बांधकामे झालेली आहेत. नागरिकांनी आपापली बांधकामे काढून घ्यावीत, अशा नोटिसा पालिकेने पूर्वीच बजावल्या आहेत.
 
आता का घाई?
रस्ता अतिक्रमणमुक्त करून द्या, असे नॅशनल हायवेने पालिकेला कळवण्यात आले आहे. रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होत असून त्यानंतर थेट कामाला सुरुवात होईल. त्यामुळे पालिकेने तातडीने रस्ता मोकळा करून द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. नियमानुसार शासकीय पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजेच जूननंतर निवासी मालमत्ता पाडता येत नाहीत. जूनपर्यंत ही बांधकामे पाडली गेली नाही, तर ऑक्टोबर महिना संपल्यानंतर म्हणजेच सप्टेंबरमध्येच कारवाई करता येऊ शकेल. त्यामुळेच पुढील २० दिवसांत ही कारवाई करण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...