आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांना दणका: पीरबाजार, मकई गेट भागातील अतिक्रमणे पाडली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- थांबलेली रस्ता रुंदीकरण मोहीम गुरुवारी (24 जानेवारी) पुन्हा सुरू झाली. दिवसभरात पीरबाजार, मकई गेट परिसरातील 22 अतिक्रमित मालमत्तांवर बुलडोझर चालवण्यात आला. पुढील काळात पीरबाजारातील 89 व मकई गेट भागातील 50 मालमत्ता पाडल्या जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली.

मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर रस्त्यावर उतरताच नागरिकांनी स्वत:हून मालमत्ता काढून घेण्यास सुरुवात केली. विकास आराखड्याप्रमाणे पीरबाजारचा रस्ता 40 मीटर रुंद आहे. त्याप्रमाणे यापूर्वीच या ठिकाणी मार्किंग करण्यात आली होती. डॉ. भापकर, उपायुक्त डाके, प्रशासकीय अधिकारी प्रियंका केसरकर, माजी मंत्री गंगाधर गाडे, नगरसेवक कृष्णा बनकर, मिलिंद दाभाडे, गौतम खरात, प्रकाश जावळे, के. व्ही. मोरे यांनी अतिक्रमण असलेल्या भागाची पाहणी केली व स्थानिकांशी संवाद साधला. मालमत्ता बाधितांना हसरूल येथे 20 बाय 30 आकाराचा भूखंड देण्यात येणार आहे. रमाई योजनेंतर्गत त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातील, असे आश्वासन डॉ. भापकर यांनी दिले. त्यामुळे अतिक्रमण पाडण्यासाठी विरोध झाला नाही. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या मागणीवरून मकई गेट, बारापुल्ला आणि महेमूद या तीन दरवाजांच्या बाजूने पूल बांधण्यासाठी 12 कोटी रुपये मिळाले आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येणार असले तरी अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. बारापुल्ला गेट येथील अतिक्रमणे पालिकेने नुकतीच हटवली. त्यानंतर आज मकई दरवाजाकडे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मोर्चा वळवला आणि अतिक्रमणे हटवण्याचे काम करण्यात आले. तेथील बाधितांनाही 20 बाय 30 चा भूखंड आणि दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत.

दोन दिवसांत मोबदला
पीरबाजार आणि मकई गेट परिसरातील अतिक्रमणधारकांशी चर्चा झाली आहे. त्याप्रमाणे दोन दिवसांमध्ये त्यांना आर्थिक मदत व हसरूल येथे प्लॉट देण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारीही अतिक्रमण पाडण्याची मोहीम सुरू राहील.
- डॉ. पुरुषोत्तम भापकर, मनपा आयुक्त.

अशी आहे आकडेवारी
22 अतिक्रमित मालमत्ता गुरुवारी पाडल्या
89 मालमत्ता पाडणार असल्याची प्रशासनाने दिली माहिती