आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापा-यांच्या इशा-यानंतर हातगाड्या हटवणे सुरू, विविध चौकात मनपाची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हातगाडीवाल्यांनी सर्व रस्ताच व्यापून टाकल्याने व्यवसाय संकटात आलेल्या व्यापा-यांनी दुकाने बंद करून मनपा आयुक्तांकडे किल्ल्या देण्याचा इशारा देताच आज हातगाड्या हटवण्याची कारवाई करण्यात आली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात केलेल्या या कारवाईदरम्यान दुकानासमोरच्या 100 फेरीवाल्यांना हटवण्यात आले.

शहागंज ते गांधी पुतळा ते सिटी चौक या रस्त्यावर ईदनिमित्त शेकडो फेरीवाल्यांनी गाड्या उभ्या केल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध फेरीवाल्यांची रांग आहेच, शिवाय दोन्ही बाजूंच्या दुकानांसमोरही हातगाड्या लावण्यात आल्याने या भागातील व्यापा-यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. दुकानांत जायलाही जागा नसल्याने व्यापारी संतापले. त्यांनी चार दिवसांपासून दुकाने बंद ठेवून मनपा व पोलिसांकडे चकरा मारत फेरीवाल्यांपासून सुटका करा, अशी मागणी केली होती. या परिसरात किमान 400 दुकाने असून फेरीवाल्यांची संख्या 500 च्या पुढे आहे. गेल्या चार दिवसांपासून व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध केला होता; पण काहीच कारवाई न झाल्याने व्यापा-यांनी थेट आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानंतर उपायुक्त किशोर बोरडे व शिवाजी झनझन यांनी पाहणीही केली.

आज सकाळीच या भागातील व्यापारी धावणी मोहल्ल्यात गोळा झाले. ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते. नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या कानावर व्यापा-यांच्या भावना टाकल्या. आयुक्तांनी उपायुक्त बोरडे व झनझन या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे सांगितले. दरम्यान, व्यापारी दुकाने बंद करण्याच्या तयारीत असताना बोरडे यांनी पोलिस बंदोबस्त मागवला असल्याचे सांगितले व दुपारी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांची भेट घेऊन व्यापा-यांना त्रास होणार नाही अशी उपाययोजना करावी, अशी मागणी केली.

अशी झाली कारवाई
सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तुकडी या कामाला देण्यात आली. शहागंजपासून पोलिस व्हॅनमधून दुकानासमोरच्या हातगाड्या हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर उपायुक्त बोरडे, झनझन, आर. एस. खन्ना यांच्यासह मनपाच्या पथकाने दुकानांसमोरच्या हातगाड्या हुसकावून लावल्या. हातगाडीवाल्यांशी किरकोळ वादावादीचे एक-दोन प्रकार वगळता ही मोहीम तशी शांततेत पार पडली.

वाटल्यास मी जागा देतो
ईद बाजारसाठी शहागंजची जागा ठरवली आहे. व्यापा-याचे नुकसान होत असून जागा कमी पडत असल्यास आमखास मैदान अथवा दुसरीकडे जागा मिळवून द्यायला मदत करेन.
किशनचंद तनवाणी, माजी आमदार

आजही कारवाई करणार
आज पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर आमच्या पथकाने दुकानांसमोरच्या हातगाड्या हटवल्या. ही कारवाई उद्याही होईल.
शिवाजी झनझन, अतिक्रमण हटाव पथकप्रमुख