आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण जमीनदोस्त करा, भाडेही वसूल करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुढीलेन परिसरातील नेहरू भवनात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याच्या मुलाने केलेल्या केलेल्या अतिक्रमणावर डीबी स्टारने प्रकाश टाकताच मनपा वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी अनधिकृत बांधकामाचा पंचनामा करा, ते जमीनदोस्त करा तसेच भाडेकरूकडून थकीत भाडे वसूल करा, असे आदेश मनपा मालमत्ता विभागातील उपायुक्तांनी प्रशासकीय विभाग (अतिक्रमण हटाव पथक) यांना दिले. दुसरीकडे अतिक्रमण होत असतानाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या नेहरू भवनातील सुरक्षा रक्षकालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

शेख युसूफ शेख महेमूद उर्फ रुस्तुम हे मनपामध्ये १९८२ पासून वाहनचालक या पदावर कार्यरत होते. ८ जानेवारी २०१० रोजी त्यांचे निधन झाले. नंतर त्यांचा मुलगा शेख जावेद याने मनपातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आईच्या नावाने १४ जानेवारी २०१० रोजी या निवासस्थानात राहण्यास परवानगी देण्याबाबत मनपामध्ये अर्ज केला. मनपाने मानवी दृष्टिकोनातून कुटुंबीयांना राहण्यास जागा दिली.
ढिसाळ कारभाराचा गैरफायदा
महानगरपालिकेच्या या निर्णयाचे उपकार मानायचे सोडून नेहरू भवनात समोरील जागेवरच दिवंगत मनपा कर्मचाऱ्याचा मुलगा शेख जावेद याने दुकानांचे बांधकाम सुरू केले. त्यावर डीबी स्टारने ८ नोव्हेंबर रोजी ‘भाडेकरूचा नेहरू भवनात कब्जा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर या प्रकरणी १० नाेव्हेंबर रोजी उपायुक्त डॉ. आशिष पवार यांनी मालमत्ता अधिकारी एस. डी. काकडे यांना प्रशासकीय अधिकारी अजमतखान (अतिक्रमण हटाव पथक) यांना तत्काळ नोटिसा बजावण्याचे आदेश दिले.