आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे अतिक्रमण हटाव पथक महिलेसमोर हतबल, आयुक्तांच्या दालनासमोर वृद्धेचे लोटांगण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संरक्षणासाठी २२ पोलिसांची फौज, उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रमुख असूनही पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक एका महिलेसमोर नमले. कोणी विश्वास ठेवणार नाही, परंतु हे वास्तव आहे. एका महिलेने अतिक्रमणाविषयी वेळोवेळी तक्रारी केल्याने पथक अतिक्रमण काढण्याचे सोपस्कर पार पाडण्यासाठी गेले. परंतु तेथील अतिक्रमणधारक महिलेने पहिल्यांदा अंगावर रॉकेल आेतले घेतले म्हणून माघारी फिरले. तर दुसऱ्यांदा तिने चाकू काढून स्वत:वर वार करण्याची धमकी दिली म्हणून पथक आल्यापावली परतले. इकडे त्या महिलेने केलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तक्रारदार महिलेने आयुक्तांच्या दालनासमोर थयथयाट केला.

असे आहे प्रकरण : दिवाणदेवडी, फकीरवाडी (नगर भूमापन क्रमांक ६३६५) येथे बाळासाहेब वाघ यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार लीलाबाई वालचंद पैठणपगारे यांनी केली आहे. 

वाघ यांनी गल्लीचा रस्ता अडवल्याचे त्यांचे म्हणणे असून हे अतिक्रमण हटवण्याची विनंती लीलबाई यांनी फेब्रुवारीपासून पालिकेकडे वेळोवेळी केली. १३ फेब्रुवारीला त्यांनी यासाठी उपोषणही केले होते. लवकरात लवकर हे अतिक्रमण काढले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण काही काढले नाही. त्यामुळे पैठणपगारे मंगळवारी मनपा मुख्यालयात दाखल झाल्या अन् आयुक्तांच्या दालनासमोर त्यांनी थयथयाट केला. 

अतिक्रमण पाडले जात नाही तोपर्यंत येथेच आंदोलन करणार, आत्मदहनही करेन अशी धमकी देत त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर लोटांगण घातले. त्यामुळे पाहणी करून अतिक्रमण काढण्यात यावे, असे आदेश आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी अतिक्रमण विभागाला दिले. 

महिला समोर आल्याने थांबलो; पुढील वेळी कारवाई करू; रवींद्र निकम
प्रश्न- पैठण पगारे यांनी अतिक्रमणाची तक्रार केली आहे, नेमका काय प्रकार आहे? 
रवींद्र निकम :
तक्रारीनंतरआम्ही दिवाण देवडीत गेलो होतो. अतिक्रमण काढण्यापूर्वी तेथील महिला अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्यासाठी आली. त्यामुळे आम्ही कारवाई पुढे ढकलली. 

प्रश्न-एक महिला तुमची कारवाई कशी थांबवू शकते? 
निकम-
कारवाईथांबवली नाही, परंतु विरोध झाला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने आम्ही थांबलो आहोत. कारवाई होणारच. 

प्रश्न-उद्या कोणीही अंगावर रॉकेल टाकेल, नस कापून घेण्याची धमकी देईल, तेव्हा तुम्ही कारवाई थांबवणार का? 
निकम-
नाही,परंतु महिला समोर आल्याने आम्ही थांबलो. त्यांनीच अतिक्रमण काढून घ्यावे, असे सांगितले आहे. त्यांनी काढले नाही तर पुढील वेळी मात्र नक्कीच अतिक्रमण पाडणार. 

प्रश्न-एक महिला मनपासारख्या मोठ्या यंत्रणेला धारेवर धरते, हे कितपत योग्य आहे? 
निकम-
मनपालाकोणी धारेवर धरू शकत नाही, आम्ही त्यांना वेळ दिलाय, पुढील वेळी अतिक्रमण पाडूनच येऊ. 

पुन्हा पथक हात हलवत परतले 
पैठणपगारेयांच्या तक्रारीनंतर यापूर्वी पालिकेचे पथक दिवाण देवडीत गेले होते. परंतु वाघ यांच्या कुटुंबातील एका महिलेने विरोध करत अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाची धमकी दिल्याने पथक परतले. मंगळवारी पैठणपगारे मुख्यालयात दाखल झाल्यानंतर आयुक्तांच्या आदेशावरून पथक पुन्हा अतिक्रमणाच्या ठिकाणी गेले. परंतु आज त्या महिलेने हाती चाकूने घेऊन नस कापून घेईल, अशी धमकी दिली अन् पथकाला कारणच मिळाले. पथक पुन्हा परतले. 
बातम्या आणखी आहेत...