आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक बळी घेणाऱ्या बायपासवर अतिक्रमण; सर्व्हिस रोड मोकळा करण्‍यासाठी फिरवणार बुलडोझर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जळगाव रोडवरील अतिक्रमणे हटवल्यानंतर बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत. कारण पंधरा दिवसांत तेथे तीन बळी गेले आहेत, अशी तक्रार सभागृह नेते गजानन मनगटे यांनी चार दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. जळगाव रोडवरील कारवाई संपताच आमचा मोर्चा इकडे वळेल, असे आश्वासन उपायुक्त रवींद्र निकम यांनी दिले होते. परंतु मंगळवारी याच रस्त्यावर एका दांपत्याचा बळी गेला अन् एक मुलगी पोरकी झाली.
 
त्यामुळे मनपा प्रशासनाने लगेचच सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवण्याची तयारी सुरू केली. जळगाव रोडवरील कारवाई मागे पडली तरी चालेल. परंतु आधी हा रस्ता मोकळा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
 
महापौर भगवान घडामोडे यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून प्रशासनाने येथील अतिक्रमणे हटवावीत. रस्ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद अंदाजपत्रकातच केली जाईल, असे घडामोडे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे या रस्त्यावरील अपघातांची आम्हाला कल्पना असून येत्या सोमवारपासूनच आम्ही तेथे पोहोचू, असे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी म्हटले आहे.
 
अतिक्रमण विभागाचे प्रमुख निकम यांनी आदेश येताच आम्ही येथील अतिक्रमणे काढू, असे सांगितले. त्यामुळे सोमवारपासूनच बीड बायपासवरील सर्व्हिस रोड मोकळा झालेला दिसेल. बीड बायपासच्या आराखड्यात सर्व्हिस रोड आहे. मात्र प्रत्यक्षात मोठा रोडच दिसत असून सर्व्हिस रोडवर अतिक्रमणे झाली आहेत.
 
अतिक्रमण विभागाकडे याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यातच स्थायी समितीच्या बैठकीतही हा विषय चर्चेला आला होता. जळगाव रोडचे काम संपताच किंवा त्याआधी आयुक्तांचे आदेश येताच हा रस्ता मोकळा करू.
- रवींद्र निकम, उपायुक्त तथा अतिक्रमण विभागप्रमुख.
 
जे शक्य ते करूच
जळगावरोडची रुंदीकरण मोहीम संपली की आम्ही लगेच बीड बायपासच्या सर्व्हिस रोडकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. जे शक्य आहे ते आम्ही करू.
- ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त.
 
पालिका काय करू शकते?
अतिक्रमण हटवल्यानंतर आम्ही येथे रस्त्यासाठी निधी ठेवू, असे महापौर घडामोडे यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात पालिकेने येथील अतिक्रमणे हटवली तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निधीतून रस्त्याचे काम होऊ शकते. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवणे एवढेच पालिकेचे काम आहे. पालिकेने अतिक्रमणे हटवली म्हणजे पुढील काम प्राधिकरण करेल. दोन्हीही बाजूंनी छोटा रस्ता तयार झाला तर दुचाकीधारक बायपासवर जाणारच नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण आपोआपच कमी होईल.
 
बीड बायपासच्यासर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे तातडीने काढण्यासाठी मी आयुक्तांना सांगणार आहे. त्यानंतर तेथे रस्त्याचे काम करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाईल.
- भगवान घडामोडे, महापौर.
 

गेल्या महिनाभरापासूनमी यावर आवाज उठवतोय. स्थायी समितीतही मागणी केली होती. येथे आणखी बळी जाऊ नये म्हणून तातडीने सर्व्हिस रोड मोकळा करायला हवा. सोमवारपासून अतिक्रमण हटवले नाही तर आंदोलन करू.
- गजानन मनगटे, सभागृह नेते.

अतिक्रमणे हटवण्याची गरज का?
बीड बायपास हा राष्ट्रीय महामार्ग आहे. निकषानुसार येथे सर्व्हिस रोड ठेवण्यात आलेला आहे. परंतु त्यावर अतिक्रमणे झाल्याने हा सर्व्हिस रोड फक्त कागदावरच दिसतो. प्रत्यक्षात पर्यायी रस्ता नसल्याने लहान वाहनेही मोठ्या रस्त्यावर येतात. या मार्गावरून मोठ्या वाहनांची कायम वर्दळ असल्याने अपघात होतात. मंगळवारी झालेल्या अपघातात दांपत्याचा मृत्यू झाला. सर्व्हिस रोड असता तर हे दांपत्य मोठ्या रस्त्यावर गेलेच नसते.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा,  बीड बायपासने घेतले पुन्हा 2 बळी; दुचाकीवरील पती-पत्नीला भरधाव ट्रकने चिरडले
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...