आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरा वर्षांनंतर पाडापाडी; विठ्ठलनगरातील अतिक्रमणे केली भुईसपाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडकोच्या हद्दीत 2001 नंतर म्हणजे अकरा वर्षांनंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाली. विठ्ठलनगरमधील नियोजित भाजीपाला मार्केटच्या जागेवरील 22 टपर्‍या शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सिडको प्रशासनाने हटवल्या. या जागेवर 1992 मध्ये केवळ दोनच टपर्‍या होत्या, अलीकडे त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.

सिडकोच्या भाजीपाला मार्केटसाठी राखीव असलेल्या जागेवरील 22 टपर्‍या शुक्रवारी भुईसपाट करण्यात आल्या. सिडकोचे मुख्य प्रशासक डी. डी. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांच्यासह सिडकोच्या 15 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांनी जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमणे काढली. एन-7 सिडको, तसेच एन 11 परिसरातील अनेक अतिक्रमणे आगामी काळात काढण्यात येणार असल्याचे साटोटे यांनी सांगितले.

मनसेचे पवार यांचा विरोध
मनसेचे बाळासाहेब पवार यांची सिडकोच्या अतिक्रमण पथकाशी बाचाबाची झाली. पवार यांनी टपर्‍या हटवण्यास विरोध केला. त्यांनी दगड हातात घेऊन बुलडोझरवर फेकण्याचा प्रयत्न केला; परंतु सिडकोच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले.

दारूड्यांसह भुरट्या चोरांचा उच्छाद
या जागेवर भूखंड माफियांनी टपर्‍या उभ्या करण्यास सुरुवात केली होती. टपर्‍यांचा आधार घेत दारुड्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परिसरात चोर्‍या चपाट्या करणारे भुरटे चोरही टपर्‍यांच्या आर्शयास थांबत होते. विठ्ठलनगरच्या पी-2 व 3 सेक्टरमधील नागरिक या भुरट्यांच्या प्रतापांमुळे त्रस्त झाले होते. महिला व युवतींची छेड काढण्याचे प्रकार वाढले होते. येथून जाणारे निवृत्त पोलिस निरीक्षक विनायक महानोर यांना लुटण्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वी येथेच घडला होता. महिला व मुली बाहेर असताना दारूडे, भुरटे चोर मैदानाकडील बाजूस लघुशंका करीत असायचे. प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात होते. अशा भुरट्या चोरांना काही राजकीय पुढार्‍यांकडून संरक्षण मिळत असल्याने त्यांचे फावत गेले.

प्लॉट वितरित करावेत
सिडकोने प्लॉटसंबंधी 1992 मध्ये सोडत काढली होती. त्यानुसार प्लॉटचे वितरण करावे. यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. सिडको आपल्याच निर्णयास बगल देत आहे.
-बाळासाहेब पवार, कार्यकर्ता, मनसे

अकरा वर्षांत वाढली अतिक्रमणे
सिडको प्रशासनाने 2001 मध्ये मुंबई उच्च् न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार अतिक्रमणविरोधी अभियान राबवले. सिडकोने जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनी, प्रमुख रस्ते, मोकळ्या जागा, हवा येण्यासाठी ठेवलेले चौक आदी सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे काढली. त्या वेळी विठ्ठलनगरातील भाजीपाला मार्केटसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. त्यावर अतिक्रमणे केली होती.