आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लेखान्यातील 39 अतिक्रमणे भुईसपाट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या 28 वर्षांपासून शहरातील सावरकर चौक ते सिल्लेखाना चौक या रस्त्याचे रुंदीकरण रोखून धरणा-या सिल्लेखाना भागातील 39 अतिक्रमणे सोमवारी महानगरपालिकेने अखेर जमीनदोस्त केली. रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आलेली ही जमीन ताब्यात घेण्यासाठी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी स्वत: घटनास्थळी उभे राहून आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर हे काम केले.
सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पालिकेने येथील 39 मालमत्तांचा ताबा घेतला. त्यासाठी तीन बुलडोझरच्या मदतीने संपादित जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. हा रस्ता रुंद व्हावा यासाठी नगरसेवक समीर राजूरकर आणि नासेर कुरेशी यांनी पाठपुरावा चालवला होता.
याच महिन्यात तीन वेळा रहिवाशांच्या दबावामुळे पालिका पथक हात हलवत परत आले होते. या वेळीही पोलिसांकडून पुरेसे बळ उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. मात्र, आज जमीन संपादित करायची, असे ठरवूनच कारवाई करण्यात आली. हजारावर जमाव तेथे जमला होता. मोहीम उधळून लावण्याची भाषा सुरू झाली होती. अशा वातावरणात कोणत्याही संरक्षणाशिवाय डॉ. भापकर जमावाला सामोरे गेले. कोणालाही घाबरायचे नाही, मी पाठीशी आहे, असे त्यांनी संबंधित अधिका-यांना सांगितले. अग्निशमन पथकाचे शिवाजी झनझन यांना मग स्फुरण चढले. विरोध करण्यासाठी मालमत्ताधारक आल्यानंतर ‘सहकार्य केले तर नियमानुसार जमीन संपादित होईल. विरोध केला तर जास्तीचे बांधकाम पाडले जाईल,’ असे झनझन यांनी ‘समजावून’ सांगितल्यावर क्षणार्धात विरोध मावळला आणि मोहीम फत्ते झाली.
अन्य मोहिमा लगेच हाती घेणार - या मोहिमेच्या यशानंतर आता रस्ता रुंदीकरणाची अन्य कामे हाती घेण्यात येणार असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले. त्यात एमजीएम ते लक्ष्मण चावडी या तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांचा समावेश आहे. त्याशिवाय आझाद चौक ते रोशनगेट, कटकटगेट ते पोलिस मेस, औरंगपु-यातील फुले चौक ते बारभाई ताजिया या रस्त्यांचा समावेश असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.
* सावरकर चौक ते नूतन कॉलनी या रस्त्यासाठी पालिका 4 कोटी रुपये खर्च करत आहे. त्यात केवळ भूसंपादन न झाल्यामुळे बाधा निर्माण होत होती. नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित होते. ते न मिळाल्यामुळे आम्हाला मोहीम हाती घ्यावी लागली. शहरातील अन्य ठिकाणच्या नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. - डॉ. पुरुषोत्तम भापकर आयुक्त