आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या गडावर पालिकेचा बुलडोझर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिल्लेखान्यातील अतिक्रमण हटाव मोहीम फत्ते झाल्यानंतर पालिका पथकाने शिवसेनेच्या बालेकिल्ला समजल्या जाणा-या गुलमंडीकडे आज मोर्चा वळविला. याच प्रभागाने खासदार, आमदार, मंत्री आणि महापौरही शहराला दिले आहेत. त्यामुळेच येथील रस्ता रुंदीकरणास कोणी धजावले नाही; मात्र आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी धारिष्ट दाखवले आणि चार इमारतींवर बुलडोझर फिरला.
संपादित जमिनीचा ताबा घेणे शक्य न झाल्यामुळे दोन दशकांपासून गुलमंडीचे रस्ता रुंदीकरण रखडले होते. आता त्या इमारतींवर पालिकेने हातोडा घातला. 17 पैकी 4 इमारती आज पाडण्यात आल्या. अन्य मालमत्ताधारकांना 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.
बसैय्ये तेल भांडार ते महेशभवनापर्यंतच्या मालमत्ता पाडण्यास आज दुपारी सुरुवात झाली. बुलडोझरच्या मदतीने वाहनतळासमोरील एक इमारत भुईसपाट करण्यात आली. अन्य तीन मालमत्ता पाडण्यात येत असताना शेजा-यांनी मालमत्ता रिकाम्या करण्यासाठी मुदत वाढवून मागितली; मात्र पथक प्रमुख शिवाजी झनझन यांनी मुदत वाढवण्यास नकार दिला.
जागा पालिकेने संपादित केलेली आहे. संबंधितांना 20 वर्षांपूर्वीच मोबदला अदा करण्यात आला आहे. तेव्हा मुदत देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत चार मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या. काही दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर माल असल्यामुळे तो काढण्यास विलंब होत होता. त्यामुळे सर्व मालमत्ताधारकांना 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. मोहीम फत्ते झाल्यास गुलमंडीवरील महत्त्वाचा हा रस्ता 30 फूट रुंद होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. उद्या रस्ता मोकळा झाल्यानंतर बारभाई ताजिया ते पैठण गेट आणि नंतर रंगारगल्लीतील अतिक्रमणे पाडण्यात येणार आहेत. आयुक्तांनी संध्याकाळी औरंगपु-यातील अतिक्रमणांचीही पाहणी केली.
बुलडोझरबरोबरच कटरचा वापर - इमारत पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात येतो. येथील काही बांधकामे अलीकडच्या काळातील असल्यामुळे बुलडोझरने पाडण्यास अडचणी येतात. त्यामुळे गॅस कटरचा वापर करण्यात येणार असल्याचे झनझन यांनी सांगितले.
स्वत:हून रिकामे केलेले बरे - मालमत्ताधारकाने स्वत:हून दुकान रिकामे केलेले बरे राहील. अन्यथा त्यांचे नुकसान होईल. उद्या 13 मालमत्ता जमीनदोस्त करून 30 फूट रस्ता रुंद करणार आहोत. - शिवाजी झनझन, पथक प्रमुख.