आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलमंडीने घेतला मोकळा श्वास; आठ इमारती भुईसपाट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिल्लेखान्यातील धडाकेबाज मोहिमेनंतर बुधवारी महानगरपालिकेने गेल्या 20 वर्षांपासून अतिक्रमणांमुळे गुदमरलेल्या गुलमंडीचा श्वास मोकळा केला. राजकीय दबावामुळे आजपर्यंत ‘मिशन इम्पॉसिबल’ समजली जाणारी ही मोहीम अखेर फत्ते झाली. आठ बहुमजली इमारती बघता बघता भुईसपाट झाल्या. या इमारतींतील भाडेकरूंनी केलेला विरोध पोलिसांनी मोडीत काढला. या लोकांनी महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दस्तुरखुद्द आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर दिवसभर गुलमंडीवर तळ ठोकून होते.
मंगळवारी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेला दणक्यात प्रारंभ केला. शहरात कायमच वादग्रस्त ठरत आलेल्या सिल्लेखान्यातील अतिक्रमणांपासून मनपाच्या पथकाने कारवाई सुरू केली. ती अतिक्रमणे भुईसपाट केल्यानंतर बुधवारी मनपाच्या पथकाने थेट औरंगपुरा, गुलमंडी भागाकडे मोर्चा वळवला. सकाळी नऊ वाजताच पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव पथक तेथे धडकले आणि कामाला प्रारंभ झाला. औरंगपुरा चौकातील दुमजली इमारत पहिल्याच झटक्यात पाडण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर सकाळपासून मोहीम आटोपेपर्यंत ठाण मांडून होते. बुलडोझर धडधडत असताना महापौर अनिता घोडेले, आमदार प्रदीप जैस्वाल रस्त्यावर प्रगटले. आधी मशीद पाडा, नंतरच आमच्या मंदिराला हात लावा, अशी मागणी दत्तमंदिराच्या पुजा-याने केल्याने गोंधळ झाला. मोहिमेविरोधात जमाव एकवटताना दिसल्यामुळे ‘कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्या’ असे म्हणत महापौरांनी कार्यालयाचा रस्ता धरला. काही भाडेकरूंनी पोलिसांशी हुज्जत घातली. दुकानातील सामानाला हात लावू देण्यास ते राजी नव्हते. शेवटी धावाधाव करून सामान बाहेर काढण्यात आले. हजार फूट लांब आणि 20 फूट रुंद रस्ता मोकळा झाला. जुनाट इमारती पडताना धुळीचे लोट दूरपर्यंत पोहोचले. गुरुवारीदेखील ही कारवाई पुढे सुरू राहणार आहे.
चेकबुकही तयार होते - अतिक्रमण पाडताना टीडीएस, एफएसआय किंवा मोबदला असे पर्याय इमारत मालकांना देण्यात आले होते. यावरून मोहिमेत अडथळे येऊ नयेत यासाठी मनपा आयुक्त सोबत चेकबुक घेऊनच आले होते. कुणी टीडीएस, एफएसआय नाकारला तर तत्काळ चेक देण्याची तयारी आयुक्तांनी केली होती. प्रत्यक्षात बुधवारी कुणीही या ‘चेकबुक सेवे’चा फायदा घेतला नाही.
बंड थांबले तेथून सुरुवात - अतिक्रमण हटाव मोहिमेची शस्त्रे दिलीप बंड यांनी जेथे खाली ठेवली, त्या सिल्लेखाना आणि गुलमंडीवरून डॉ. भापकर यांनी या मोठ्या मोहिमेची सुरुवात केली. जनक्षोभ, दबाव आणि कोर्टकचे-यांमुळे खासदार, आमदारांच्या मालमत्ता असलेल्या गुलमंडीवर बुलडोझर चालवण्याचे बंड यांनी टाळले होते. तेथेच डॉ. भापकरांनी शड्डू ठोकले. या वेळी कोणताही गाजावाजा न करता अचूक नियोजनामुळे गुलमंडीवरील अतिक्रमणे हटूच शकत नाहीत, असा छातीठोक दावा करणा-यांची बोलती बंद केली. दिवसभर त्यांचा मोबाइल गाडीच्या सीटवर पडून होता. नगरसेवक अनिल मकरिये यांनाही त्यांनी या मोहिमेचे श्रेय दिले.
कडक उपवास, धडक मोहीम - आयुक्त डॉ. भापकर, पथकप्रमुख शिवाजी झनझन, सपना वसावा यांच्यासह पथकातील सर्वच कर्मचा-यांना कडकडीत उपवास घडला. पथकाचे जेवण किंवा अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली नव्हती. स्वत: डॉ. भापकर यांनी रस्त्यावर उभे राहून चहा घेत दिवस घालवला. आयुक्तच जेवणासाठी जात नसल्यामुळे इतरांनाही कोठे जाता आले नाही.
रस्ते रुंद होणारच - आता हाती घेतलेली मोहीम सर्व रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याशिवाय थांबणार नाही. टीडीआर, एफएसआय विनाविलंब मिळेल. नागरिकांनी सहकार्य करावे. सहकार्य न केल्यास नुकसान होऊ शकते. शहराच्या विकासासाठीच हे काम आहे. - डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त