आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव मोहिमे धडाका सुरूच, 17 इमारती पाडल्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गुलमंडीवरील अतिक्रमण हटाव मोहिमेत तिस-या दिवशी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या मालकीच्या इमारतीसह अनेक बड्या व्यापा-यांच्या 17 मालमत्तांवर महापालिकेने बुलडोझर फिरवला. पाहता पाहता ही अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली. सायंकाळी ही मोहीम दोन धार्मिक स्थळांच्या पाय-यांवर येऊन थबकली. गेल्या 20 वर्षांपासून ज्यांच्या जोरावर ही अतिक्रमणविरोधी मोहीम यशस्वी होऊ शकली नव्हती त्यांच्याच मालमत्तेवर बुलडोझर फिरत असल्याचे पाहून 50 पेक्षा अधिक जणांनी नांगी टाकून दुकाने रिकामी करून दिली.
अतिक्रमण हटाव पथकाचे बुलडोझर्स सकाळीच धडधडत गुलमंडीवर आले. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या आगमनापूर्वीच पथकाने आमदार तनवाणी यांच्या मालकीच्या तीन मजली इमारतीवर प्रथम बुलडोझर फिरवले. आमदाराचीच इमारत पाडण्यात येत असल्याचे दिसताच अन्य दुकानदारांनी सामानाची आवराआवर केली. त्यामुळे पथकाचे काम सोपे झाले. पाडण्यात येणा-या दुकानांमध्ये भाडेकरूच जास्त असल्यामुळे इमारत मालकांनी जाहीरपणे आनंद व्यक्त केला. पैठणगेटपर्यंत अतिक्रमणात येणा-या इमारतीतील दुकाने सायंकाळपर्यंत रिकामी झाली. ही संख्या 50 पेक्षा अधिक आहे.
गुलमंडीवर दिला बड्यानांही धक्का! - बारभाई ताजिया येथील मशिद आणि त्यापासून काही अंतरावर असलेल्या दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा काही भाग अतिक्रमणात येतो. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांनी सकाळी दोन्ही स्थळांना भेट दिली. मशिद आणि मंदिराचा अतिक्रमणात येणारा भाग पाडण्यास दोन्हीकडून होकार देण्यात आला. एकाच वेळी दोन्हीही बांधकामे पाडण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यास डॉ. भापकर यांनी होकार दिला. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मशिदीचीही पाहणी आणि अतिक्रमणीत भाग पाडण्याची तयारी सुरू केली. मात्र सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रत्येकी एक बुलडोझर मंदीर आणि मशिदीसमोर उभे ठाकले. दोन्ही बाजुकडून काही भाग स्वत:हून काढून घेण्यात आला. मात्र नंतर अचानक गर्दी जमली आणि आधी त्यांचे काढा म्हणत बुलडोझरला घेराव घालण्यात आला. मंदिराजवळ काहींनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान आयुक्तांनी वाहेद चाचा यांच्याशी चर्चा केली. रस्त्यावर चर्चा योग्य नाही. दालनात बसून चर्चा करू, असे ठरल्यामुळे आजची मोहीम संपल्याचे डॉ. भापकर यांनी जाहीर केले. उद्या शुक्रवार असल्यामुळे पोलिस बंदोबस्त मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून ही मोहिम पुढे सुरू होण्याची शक्यता आहे.
तनवाणींकडून 15 लाखांचा निधी - अतिक्रमण काढून खुल्या झालेल्या जागेवर लगेच रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले. यासाठी मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमाच्या कलम 67 (3)(क)चा आधार घेण्यात येणार असून लगेच हे काम होणार आहे. अत्यावश्यक कामांसाठी कोणत्याही सभागृहाच्या परवानीशिवाय खर्च करण्याची तरतूद असलेल्या या कलमाचा पहिल्यांदाच चांगल्या कामासाठी वापर होणार असल्याचे डॉ. भापकर यांनी प्रांजळपणे सांगितले. या रस्त्याच्या कामासाठी 15 लाख रुपये आमदार निधी देणार असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी सांगितले.
रस्ता मोकळा होणारच - दोन धार्मिक स्थळांची अतिक्रमणे समोर असतानाच अंधार झाल्यामुळे आज ही मोहीम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या ही मोहीम पुढे सुरू करण्यात येणार आहे. चर्चा करण्याची विनंती दोन्ही बाजूने करण्यात आली आहे. त्यातून मार्ग निघेल आणि रस्ता रुंद होणारच.’’ - डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त
आता लक्ष्मण चावडी ते एमजीएम - गुलमंडीवरील रस्ता 17 ते 21 मीटर रुंद करण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पुढील लक्ष्य निश्चित केले आहे. लक्ष्मण चावडी ते महात्मा गांधी मिशन संस्था, खोकडपुरा ते पानदरिबा मार्गे जिल्हाधिकारी निवासस्थान, रोशनगेट ते आझाद चौक आणि कटकट गेट ते पोलीस आॅफिसर्स मेस या रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर केली जाणार आहेत. लक्ष्मण चावडी ते एमजीएम आणि खोकडपुरा ते जिल्हाधिकारी निवासस्थान या दोन रस्त्यावर मार्किंग करण्याचे आदेश डॉ. भापकर यांनी अधिका-यांना दिले आणि लगेच त्याची अमलबजावणी सुरू झाली. ही मोहीम लगेच हाती घेतली जाणार आहे. डॉ. भापकर यांनी सकाळी पानदरिबा येथील रस्त्याची पाहणी केली. तेथील अतिक्रमणधारकांची भेट घेऊन सामान काढून घ्या, असा सल्ला दिला.
रात्रीही हटवणार ढिगारे - गुलमंडी येथील 25 इमारती जमीनदोस्त केल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर साचलेले ढिगारे सहा मालमोटारींतून हलवले जात आहेत. हे ढिगारे प्रचंड असल्याने काल रात्री एक वाजेपर्यंत मलबा वाहून नेण्याचे काम सुरू होते. आज रात्रीही उशिरापर्यंत मोटारी धावत होत्या. शुक्रवारीही तसेच चित्र राहणार असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.
पाडलेली बड्यांची दुकाने - सोनचाफा (अंदाजे 600 चौरस फूट), निरुपमा साडी सेंटर (600 चौ.फू), मधुर स्वीट््स (200), गंगा-जमुना (900), प्रिया बूट हाऊस (200), भारत खाणावळ (500), पूजा साडी (300), दुर्गा प्लायवूड(800), मेट्रो फॅशन, भारत टी सप्लायर्स (400), महादेव मंदिराचा समोरचा भाग (1000)
माझे स्वप्न साकार - सहा वर्षांपूर्वी गुलमंडीवरील रस्ता रुंदीकरणाची मोहीम मी महापौर असताना हाती घेतली होती. व्यापा-यांकडून सहकार्यही मिळवले होते. मात्र, काहींचा विरोध झाल्यामुळे त्या वेळी ते राहून गेले. गुलमंडीचे रस्ते रुंद झाल्याने माझे स्वप्न साकार झाल्याचा मला आनंद आहे. म्हणून रस्त्याच्या कामासाठी आमदार निधीतून 15 लाख रुपये देणार आहे. - किशनचंद तनवाणी, आमदार