आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृष्णेश्वर मंदिराला अतिक्रमणांचा विळखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि जगप्रसिद्ध लेण्यांजवळ असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिराला शेकडो दुकानांचा विळखा पडला आहे. संरक्षित स्मारकाच्या यादीत असूनही ही परिस्थिती असल्याने या पुरातन मंदिराचे जतन करण्यात अडचणी येत आहेत.
शिवाय र्शावणात लाखो भाविक येत असल्याने अपघाताची भीती असते. यावर पुरातत्त्व खात्याने विश्वस्तांना नोटीस पाठवण्याचा सोपस्कार पूर्ण केला आहे. दुसरीकडे वेरूळचा विकास आराखडा तयार आहे, त्यासाठी शासनाने दीड कोटींवर निधीही दिला आहे; परंतु केंद्रीय पुरातत्त्व खाते, मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या वादामुळे कुठल्याही वापराविना निधी परत जातो हे दुर्दैव.
संरक्षित स्मारकाच्या यादीत - या मंदिराचा दोन वेळा जीर्णोद्धार झाल्याचे दाखले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी प्रथम, तर अठराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी दुसर्‍यांदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याने केंद्रीय पुरातत्त्व खात्याने 1961 मध्ये या मंदिराचा संरक्षक स्मारकांच्या यादीत समावेश केला. पूर्वी पुरातत्त्व विभागाची कडक शिस्त होती; पण आता तशी ती राहिली नाही. स्थानिक विश्वस्त मंडळ अन् पुरातत्त्व खात्यातील वाद वाढत गेल्यानेच मंदिराभोवती हे अतिक्रमण फोफावले आहे. दुकानदारांनी जागा मिळेल तेथे दुकाने थाटली आहेत त्यामुळे मंदिराचे सौंदर्य तर नष्ट झालेच, शिवाय वास्तू आणि भाविकांना धोका वाढला आहे.
तब्बल 106 दुकाने - मंदिराभोवती तब्बल 106 दुकाने आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराला खेटूनच ही दुकाने सुरू होतात. समोरचा परिसर आणि दाटीवाटीत जागा मिळेल तेथे ही दुकाने वसली आहेत. यात फूल विक्रेते, शोभेच्या वस्तू, पुस्तक विक्रेते अन् छोट्या टपर्‍यांचाही समावेश आहे. याच ठिकाणी पार्किंगसाठीही जागा सोडण्यात आलेली आहे. दुकानांच्या या दाटीवाटीत वाहनेही घुसवली जातात. मंदिराचा श्वास कसा कोंडला आहे हे मंदिराच्या कळसावर गेले तर समजते. आजघडीला संस्थानच्या नोंदीनुसार प्रत्यक्षपणे 106 दुकाने आहेत; पण हातात सामान घेऊन फिरणारे विक्रेते, याच परिसरात जमिनीवर चादर अंथरून बसलेले विक्रेते यांची संख्या मोजली तर हा आकडा 300 च्या आसपास जातो.
व्यापारी संकुलाची मागणी
- विश्वस्त आणि पुरातत्त्व विभागाने हात टेकल्याने मंदिर वेढले गेले आहे. मात्र, दुकानदारांना पर्यायी जागा हवी आहे. मंदिर परिसरात बांधकाम करता येत नाही, प्रशासन पुढाकार घेत नाही. तर, विश्वस्त पर्याय नसल्याचे सांगतात. त्यामुळे कुणाचा पायपोस कुणाला नाही. वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय नसल्याने वर्षानुवर्षे हा प्रश्न सुटलेला नाही. किंबहुना तो आणखी गंभीर झाला आहे.
रस्ताही चिंचोळा - र्शावण जवळ आला आहे. दरवर्षी या दिवसांत 4 ते 5 लाख भाविक येतात. बाहेरगावाहून येणार्‍या गाड्यांची संख्या खूप असते. त्यामुळे मंदिरासमोरच्या तिन्ही पार्किंग कमी पडतात. लाखो लोकांची दर्शनासाठी रांग, वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि गोंगाट, दुकानांची गर्दी यामुळे पोलिसांचा ताणही वाढतो. सर्वांना व्यवस्थित दर्शन व्हावे या दृष्टीने येथे कोणात्याही सुधारणा झालेल्या नाहीत.
आम्हाला विकास करायचा आहे - वेरूळचे हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना असल्यानेच 1961 मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून जतन करण्याची जबाबदारी घेतली. दर तीन ते चार वर्षांनी आम्ही मंदिरावर कोटिंगची प्रक्रिया करतो. तसेच आमच्या नियमानुसार मंदिरापासून 300 मीटर परिसरात एकही दुकान अथवा घर असू नये अशी आमची भूमिका कायम आहे. दुकानदारांचेही नुकसान होणार नाही हे लक्षात घेऊन आम्ही लवकरच तोडगा काढू. एम. महादेवय्या, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व विभाग
अतिक्रमणे तत्काळ हटवलीच पाहिजेत - मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. मंदिर प्रशासन व पुरातत्त्व विभागात वाद नाही; परंतु पुरातत्त्व विभागाचे नियम आता 2012 पासून आणखी कडक झाले आहेत. 300 मीटर परिसरात कोणतेही बांधकाम ते करू देत नाहीत. त्यातले 100 मीटरचे नियम अधिक कडक आहेत. त्यांना विनंती करून पुढच्या 200 मीटरमध्ये तात्पुरते काम करता येत असेल तर हे अतिक्रमण काढून दुकानदारांना चांगली जागा द्यावी म्हणजे भाविकांचीही सोय होईल.चंद्रकांत खैरे, खासदार