आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिक्रमण वाचवण्यासाठी नकाशातून नाला गायब, जयभवानीनगरात भूमिगत गटार योजनेच्या कामावरून उघड झाला प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ९७ इमारतींचे अतिक्रमण वाचवण्यासाठी जयभवानीनगर परिसरातील नालाच नकाशातून गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आला.
महापौर त्र्यंबक तुपे यांनी नुकतेच नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते. त्यावर कारवाई सुरू झालेली नसताना हा प्रकार समोर आला आहे. वॉर्डाच्या नगरसेविका मनीषा मुंडे या भूमिगत गटार योजनेची मुख्य मलनिस्सारण वाहिनी टाकण्याची मागणी वर्षभरापासून करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. जूनच्या पहिल्याच पावसात एका शोरूमसह अनेक घरांत पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या भागातून वाहणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण करून त्यातून मुख्य मलजल निस्सारण वाहिनी टाकण्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. त्यावर सभापती मोहन मेघावले यांनी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांना खुलासा करण्याच्या सूचना केल्या. जयभवानीनगरातील नाल्याची नाली झाली असून, त्यावर ९७ इमारतींचे अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासकीय विभागाकडे फाइल पाठवली असल्याचा खुलासा सिद्दिकी यांनी केला. त्यामुळे सभापतींनी अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख उपायुक्त रवींद्र निकम यांना खुलासा करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी याप्रकरणी नगररचना विभागाकडून अभिप्राय मागवला होता. त्यात नकाशावर नालाच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भूसंपादन करून नाला रुंद करण्याची प्रक्रिया करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. नगररचना विभागाचे उपअभियंता ए. बी. देशमुख म्हणाले, जयभवानीनगरात छोट्या नाल्यातून पाणी वाहते. हा भाग सिडकोचा डिनोटिफाइड भाग आहे. मात्र, मनपाच्या विकास आराखड्याच्या नकाशात नाल्याची नोंद गटार अशी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच सदस्य अवाक् झाले. तसेच पर्याय म्हणून जयभवानीनगरसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनपर्यंत मुख्य वाहिनी टाकण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असल्याचे अफसर सिद्दिकी यांनी सांगितले. आता जुलै रोजी बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश मेघावाले यांनी प्रशासनाला दिले.

तोंडपाहून कामे केली, चौकशीची मागणी :भूमिगत गटार योजनेची कामे तोंड पाहून करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सीताराम सुरे यांनी केली. आपल्या वॉर्डात साई लॉन्सपासून सुरू होणाऱ्या मुख्य वाहिनीचे काम अनेक महिन्यांपासून बंद आहे, असे ते म्हणाले. भूमिगतची वाटचालदेखील समांतरच्या दिशेने सुरू असल्याचा आरोप नितीन चित्ते यांनी केला. जयभवानीनगरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याचा प्रवाह वळवण्याची मागणी कैलास गायकवाड यांनी केली.

४६४ कोटींपैकी उरले फक्त ३० कोटी
४६४ कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम अडीच वर्षांपासून सुरू आहे. एसटीपी प्लांट, मुख्य वाहिन्यांची कामे अंतिम टप्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यावर सीताराम सुरे यांनी किती निधी शिल्लक आहे, अशी विचारणा अफसर सिद्दिकी यांच्याकडे केली असता, त्यांनी ३० कोटी रुपयांचा निधी शिल्लक असल्याचा खुलासा केला. उर्वरित कामांसाठी एवढा निधी पुरेल का, अशी विचारणा केली असता, वाढीव निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...