आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैव ऊर्जानिर्मितीत एक लाख शास्त्रज्ञांना संधी, डॉ. जे. बी. जोशी यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतात जैव ऊर्जानिर्मितीत (बायोमास) देशभरात एक लाख शास्त्रज्ञांना काम करण्याची संधी असल्याचे मत पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी व्यक्त केले. सीएमआयएने आयोजित केलेल्या ऊर्जा परिषदेत ते बोलत होते.
तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या या परिषदेला जोशी यांनी "नॅशनल एनर्जी मॅप अँड बायोमास पोटेंशियल' या विषयावर सादरीकरण केले. ते म्हणाले, जगाला 15टेरावॅट वीज लागते. ( 1 टेरावॅट म्हणजे 10 लाख मेगावॅट) त्यापैकी सुमारे एक लाख 62 हजार टेरावॅट ऊर्जा सू्र्याकडून मिळते. यापैकी 15 हजार टेरावॅट ऊर्जेचे रूपांतर वीजनिर्मितीमध्ये करणे शक्य आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळत असताना त्याचा वापर होत नाही. सौर ऊर्जा, पवन ऊर्जेतून मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती शक्य आहे. देशातही बायोमास ऊर्जेकडे दुर्लक्ष होत आहे. वास्तविक भविष्यात बायोमास क्षेत्रात सर्वाधिक संधी आहे. आज कोळशाचे साठे संपत चालले आहेत. कोळशामधून एक मेगावॅट ऊर्जा निर्मितीसाठी पाच कोटी खर्च येतो, तर सौरऊर्जेसाठी सुरुवातीला 48 कोटी प्रतिमेगावॅट आणि आता 24 कोटी इतका खर्च येतो. तो 12 कोटी रुपयांपर्यत खाली येऊ शकतो. परिषदेचे उदघाटन कुलगुरु बी.ए.चोपडे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर सीएमआयएचे अध्यक्ष मुनीश शर्मा, ऊर्जा परिषदेचे संयोजक प्रसाद कोकिळ, रितेश मिश्रा, प्राचार्य पी. एस. अडवाणी, आशिष गर्दे यांची उपस्थिती होती. जोशींची ऊर्जा थक्क करणारी कार्यक्रमात जोशी यांचे सर्वात शेवटी सादरीकरण होते. त्यांची ऊर्जा सर्वांनाच थक्क करणारी ठरली. सादरीकरणावेळी त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे सादरीकरणादरम्यान त्यांना थकवा जाणवत होता. मात्र मराठवाड्यात आल्यानंतर मला ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदासाचा आशीर्वाद पाठीशी असल्याचे वाटते असे सांगत त्यांनी सादरीकरण सुरूच ठेवले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अनेकदा थांबावे लागत होते. या वेळी त्यांना पाच मिनिटांची विश्रांतीही देण्यात आली. त्यानंतर पाणी पीत त्यांनी त्यांचे सादरीकरण पूर्ण केले. व्यत्यय आल्याबद्दल माफी मागत पुढच्या वेळी आल्यानंतर पुन्हा न थांबता सादरीकरण करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनतर सर्व उपस्थितांनीही उभे राहून टाळ्या वाजवत त्यांच्या उत्साहाला दाद दिली.
कचरा, पालापाचोळ्यातून बायोमास ऊर्जानिर्मिती
बायोमास ऊर्जानिर्मितीसाठी अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. ओला कचरा, पालापाचोळा, उसाची चिपाटे, कापसाच्या पराट्या या सारख्या टाकाऊ पदार्थ जाळून यापासून कोळसा तयार करून ऊर्जानिर्मिती करता येते. ग्रामीण भागात यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती शक्य आहे.
सीएमआयएचे पाऊल योग्य दिशेने
या कार्यक्रमात कुलगुरू चोपडे यांनी आयआयएमसाठी सीएमआयचे पाऊल योग्य दिशेने असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, आयआयएमसाठी राज्यात फक्त सीएमआयकडून चळवळ उभी केली जात आहे. ज्या पद्धतीने हा प्रयत्न सुरू आहे त्याचा फायदा होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी दिलीप यार्दी यांना सीएमआयच्यावतीने 11 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार रितेश मिश्रा यांनी मानले. या वेळी प्रशांत देशपांडे, आर.आर.पांडे, डॉ अर्चना ठोसर,जयंत शिरडकर यांची उपस्थिती होती. रेल्वेस्टेशन रोडवरील शासकीय अिभयांत्रिकी महाविद्यालय ते तापडिया नाट्यमंदिर अशी एनर्जी वॉक रॅली काढण्यात आली.
25 वर्षांत बायोमास सर्वात मोठा उद्योग
ऑस्ट्रेलियाचे न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. जी. इव्हन्स यांनी जगाच्या ऊर्जानिर्मितीबाबत सध्याच्या स्थितीबद्दल सादरीकरण केले. ते म्हणाले, 1980 पासून कोळशापासून जगात वीजनिर्मितीस मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. मात्र, मागणी वाढली आणि पुरवठा कमी होत चालला आहे. तसेच इंधनाचे साठेदेखील कमी होणार आहेत. भविष्यात कोळशाची टंचाई होणार असल्यामुळे बायोमास ऊर्जानिर्मिती ही गरज आहे. त्यामुळे 25 वर्षांनंतर बायोमास हा सर्वात मोठा उद्योग बनेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एक लाख मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प
एमईआरसीचे माजी सदस्य जयंत देव म्हणाले, देशात दोन लाख 55 हजार मेगावॅट ऊर्जानिर्मितीची क्षमता आहे. मात्र, भारतात केवळ एक लाख 45 हजार मेगावॅट इतकीच ऊर्जानिर्मिती होते. मुख्यत: इंधन पुरवठा, इंधनाच्या वाढत्या किमती तसेच ऊर्जानिर्मितीचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूमध्ये गॅस पुरवठा होत नाही. त्यामुळे क्षमतेइतकी ऊर्जानिर्मिती होत नाही. तसेच ऊर्जा कंपन्यांमध्ये निकोप स्पर्धा व्हायला हवी. ऊर्जा कंपन्यांमध्ये स्पर्धा झाल्यास त्याचा फायदा ग्राहकाला होऊ शकतो. मात्र, असे होताना दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.