आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Energy Project : DMIC Electricity Problems Solve; November Starts Its Work

ऊर्जा प्रकल्प : डीएमआयसीच्या विजेचा प्रश्न मिटणार; नोव्हेंबरमध्ये सुरू होणार पहिली वाहिनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - छत्तीसगडहून येणारी वीज औरंगाबादहून राज्यात वितरित करणार्‍या पॉवर ग्रीडच्या औरंगाबाद येथील उपकेंद्राचे जवळपास 40 टक्के काम पूर्ण झाले असून निर्धारित वेळापत्रकानुसार काम झाल्यास या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये तयार होणारी वीज वाहून आणणारी एक वाहिनी सुरू होईल. 2014 पर्यंत सुमारे 4 हजार मेगावॅट वीज औरंगाबादमधून राज्यात वितरित केली जाणार आहे.

केंद्रात सुशीलकुमार शिंदे ऊर्जामंत्री असताना आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना औरंगाबादेत नॅशनल पॉवर ग़्रीडच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. औरंगाबादपासून 21 किमी अंतरावर असलेल्या चित्तेपिंपळगावनजीक पॉवर ग्रीडचे उपकेंद्र उभे राहत आहे. 270 एकरांत उपकेंद्र उभारणीचे काम जोरात सुरू आहे. नॅशनल पॉवर ग्रीडच्या या प्रकल्पाशिवाय चित्तेपिंपळगाव येथे महावितरणचे 220 के. व्ही. चे एक उपकेंद्र उभारले जात आहे. थोडक्यात चित्तेपिंपळगाव हे राज्यासाठी पॉवर हब होणार असून येत्या दोन वर्षांत येथून राज्याला पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा केला जाणार आहे.

अशी येणार वीज
छत्तीसगड या शेजारच्या राज्यात असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पांतून एक हजारहून अधिक किमीचा प्रवास करून वीज औरंगाबादपर्यंत आणली जाणार आहे. त्यासाठी विदर्भात वर्धा येथेही पॉवर ग्रीडचे उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. छत्तीसगड-वर्धा-औरंगाबाद असा प्रवास करून येणारी वीज औरंगाबादहून मुंबईजवळील पडघा तसेच पुणे, सोलापूर येथे वीजपुरवठा केला जाणार आहे. पुण्या - मुंबईची विजेची वाढती गरज ध्यानात घेऊन औरंगाबादहून त्यांना छत्तीसगडची वीज पुरवली जाणार आहे. एकूण चार हजार मेगावॅट वीजपुरवठय़ाची क्षमता असलेल्या या उपकेंद्राचा पूर्ण क्षमतेने वापर झाला तर आगामी काळात लोडशेडिंगचे भूत कायमचे उतरणार आहे.

डीएमआयसीसाठी तयारी
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पश्चिम भारताचे औद्योगिक चित्र पालटणार आहे. त्यात औरंगाबाद आणि नाशिक ही दोन प्रमुख औद्योगिक केंद्रे विकसित केली जाणार आहेत. औरंगाबादेत शेंद्रा ते बिडकीन असा पट्टा औद्योगिक प्रकल्पांसाठी विकसित केला जाणार असून त्यासाठी विजेची मोठी मागणी असणार आहे. त्यामुळेच पॉवर ग्रीडच्या या उपकेंद्राच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उपकरणे, यंत्रसामग्री आली
या उपकेंद्रापर्यंत 400 केव्ही आणि 765 केव्ही वीज वाहिन्यांद्वारे वीज आणली जाणार आहे. या वीज वहनासाठी उपकेंद्राला लागणारी उपकरणे आणि यंत्रसामग्री दाखल होत असून उपकेंद्रातील टॉवर उभारणीचे काम वेगात सुरू आहे.

असा झाला प्रारंभ
पॉवर ग्रीडच्या औरंगाबादच्या प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरू झाले. त्यानंतर जमिनीचा शोध सुरू झाला. जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून पॉवर ग्रीडने चित्तेपिंपळगावची निवड केली. तेथील 270 एकर जमीन 79 शेतकर्‍यांना बाजारभावापेक्षा जास्त मोबदला देत पॉवरग्रीडने विकत घेतली. 2010 मध्ये या जमीन खरेदीचे करार झाले आणि 2011 मध्ये रजिस्ट्री करण्यात आली. त्यानंतर जमीन ताब्यात घेऊन तेथे उपकेंद्र उभारणीचे काम हाती घेण्यात आले. या वर्षीच्या मे महिन्यापासून कामाला गती आली असून पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका वाहिनीद्वारे वीज आणली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर वाहिन्या सुरू होऊन 2014 मध्ये हा प्रकल्प संपूर्णपणे कार्यरत होईल.


पुढे काय ?
मराठवाड्याला सध्या चंद्रपूर, भुसावळ आणि परळी येथून वीजपुरवठा होतो. तसेच छत्तीसगड व मध्यप्रदेशातूनही वीजेची गरज भागवली जाते. पावर ग्रीड प्रकल्पामुळे छत्तीसगडहुन वर्धामार्गे औरंगाबादला थेट वीजेचे वहन केले जाणार आहे. येथूनच सर्व राज्यात वीजवहन होईल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वीजवहनात सुसूत्रता येईल. परिणामी वीजगळती कमी होण्यास मदत होणार आहे.


औरंगाबादसह-मराठवाड्याला सहज वीज मिळणार
सध्या औरंगाबादला भुसावळ, चंद्रपूर येथून वीजपुरवठा केला जातो. जास्त मागणी झाल्यास या ग्रीडमधून कमी वीज मिळण्याचे प्रकार घडत असतात. पॉवर ग्रीड प्रकल्पामुळे छत्तीसगडहून थेट औरंगाबादपर्यंत वीज येणार असल्याने औरंगाबाद आणि मराठवाड्याला ती सहज उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय मुंबई, पुणे आणि सोलापूरसाठी येथूनच वीजपुरवठा केला जाणार आहे.


दृष्टिक्षेपात प्रकल्प
क्षमता : 4000 मेगावॅट
प्रकल्पाचा आकार : 270 एकर
पहिल्या टप्प्याला प्रारंभ : नोव्हेंबर 2013
प्रकल्प पूर्ण होणार : 2014


असे आहे टाइमटेबल
ठिकाण अंतर कालावधी
वर्धा - औरंगाबाद (400 केव्ही) 700 किमी जुलै 2013
औरंगाबाद- औरंगाबाद (400 केव्ही) - सप्टेंबर 13
वर्धा - औरंगाबाद (765 केव्ही) 689 किमी जुलै 2014
औरंगाबाद - बोईसर (400 केव्ही) 648 किमी जुलै 2014


निर्धारित तारीख गाठणार
पॉवर ग्रीडच्या या प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून टॉवर उभारणी आणि इतर कामांना गती आली आहे. साधारणपणे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. याच गतीने काम सुरू राहिल्यास आणि निर्धारित तारीख निश्चित गाठू शकू. एन. गोविंदानी, मुख्य व्यवस्थापक, पॉवर ग्रीड