आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील सिद्धार्थ उद्यानात बंगाली टायगर्सची गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात वाघाच्या पिंज-यामोरील संरक्षक खंदकात पडलेल्या युवकाला वाघाने ठार मारल्याच्या घटनेनंतर देशात हळहळ व्यक्त झाली. त्यामुळे शहरातील सिद्धार्थ उद्यानाबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या येथील बंगाली वाघांची संख्या वाढल्याने त्यांना कुठे ठेवायचे, असा प्रश्न प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाला पडला आहे. त्यामुळे येथील अतिरिक्त वाघ देशातील इतर प्राणिसंग्रहालयांत हलवण्याची विनंती करणारे पत्रच प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी पाठवले आहे.

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातही अशी घटना घडू शकते काय, यावर चर्चेचे फड रंगले. मागील वर्षी उद्यानातील बिबट्या जाळी तोडून पळाला होता. महत्प्रयासाने त्याला पकडण्यात यश आले होते. तसेच गेल्या वर्षी वन विभागाने पकडून आणलेला बिबट्याही निसटला होता. दीड दिवस घालवून त्याला जेरबंद केले होते. अशा सर्वच घटनांचा विचार करून सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय संचालकांनी देशातील इतर प्राणिसंग्रहालयांना वाघ घेऊन इतर प्राणी देण्याची विनंती करणारे पत्र पाठवले आहे.
उदंड झाले वाघ ..
सिद्धार्थ उद्यानात वाघांना ठेवण्यासाठी जागा अपुरी आहे. पाच ते सहा वाघच येथे सुस्थितीत राहू शकतात. महिनाभरापूर्वी चार बंगाली बछडे जन्मल्याने बंगाली टायगर्सची संख्या दहा झाली आहे. त्यामुळे त्यांचा सांभाळ करणे जिकिरीचे झाले आहे. येथे बंगाली टायगर्सची संख्या दहा असून यात चार वाघ अतिरिक्त आहेत. यात दोन नर व दोन मादींचा समावेश आहे. सांबरांची संख्या ४२ असून १५ सांबर, ४ नीलगायी, १६ काळवीट, ३ कोल्हे, ३ लांडगे, २ बिबटे , २ अस्वले, १ पांढरा मोर अतिरिक्त आहेत.