आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेराल विज्ञान तर निश्चित उगवेल तंत्रज्ञान, अभियंता दांपत्याचा स्तुत्य उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विमानाचा शोध कुणी लावला, यंत्रे कशी कामे करतात, सोलर कुकर म्हणजे काय... हे साधे साधे प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना भंडावून सोडतात. लहान वयातच त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण केली तर... हा विचार प्रा. विनोद आणि प्रा. भारती दामधर या अभियंता दांपत्याच्या मनात आला आणि त्यांनी तो प्रत्यक्षातही उतरवला. ‘विज्ञान पेराल तर तंत्रज्ञान उगवेल...’ हे अभियान सुरू केले. महिन्याच्या दर रविवारी तिसरी ते अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते आपल्या घरी मोफत विज्ञानाचे प्रयोग शिकवतात. गेल्या वर्षभरात मुलांनी त्यांच्या या छोट्याशा कार्यशाळेत अनेक उपयुक्त मॉडेल्स तयार केले आहेत.
मुलांना खूप वैज्ञानिक प्रश्न पडत असतात, ज्यांची उत्तरे त्यांना मिळतातच असे नाही. उपलब्ध शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना जगातील सर्वच प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या गोष्टी माहीत होतातच, असेही आपण नक्की सांगू शकत नाही. म्हणून शिकण्यासोबतच मनसोक्त खेळतील, रमतील असा एखादा प्लॅटफॉर्म मुलांना उपलब्ध करून देता आला पाहिजे, असा विचार दामधर दांपत्याने केला त्याचे उत्तरही त्यांनी शोधले. शिवाजीनगर येथील आपल्या घरामधील छोट्याशा जागेत ते चालवत असलेल्या या मोफत कार्यशाळांमध्ये वैज्ञानिक प्रमेय, फिनॉमेनन्स, मेकॅनिझम इत्यादी गोष्टी हसत-खेळत शिकवल्या जातात. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा हाच यामागील उद्देश असल्याचे ते सांगतात. प्रा. दामधर हे एमआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापक असून त्यांनी हा उपक्रम ऑगस्ट २०१५ रोजी सुरू केला आहे.

‘वीस्पार्क बड्डिंग ब्रेन्स’
या अनोख्या सायन्स क्लासमध्ये थेअरीसोबतच प्रॅक्टिकलवरही भर दिला जात असल्याचे प्रा. दामधर सांगतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोेलॉजीमधल्या वेगवेगळ्या संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या जातात. उदाहरणार्थ, झाडाची पाने हिरवीगार, तर फुले पांढरी, पिवळी, लाल कशी? तव्यावर पाणी शिंपडल्यास थेंब डान्स का करतात? हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे नेमके काय? ताप येतो म्हणजे काय होते? चपाती का फुगते? अशा विविध संकल्पना विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या समजावून सांगितल्या जातात. या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शालेय स्तरावरही मुलांना खूप फायदा होत असल्याचे प्रा. दामधर म्हणाले.

ज्ञानाच्या जिज्ञासेतून विज्ञान
आजच्या दैनंदिन जीवनातील एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाचा परीसस्पर्श झालेला नाही. अंघोळीचा गिझर, स्वयंपाकातला कुकर, हिंडायला स्कूटर, टोस्टर, रूम हिटर अन् बरेच काही... रोज सहजच पदोपदी आपण विज्ञानाचा वापर करतो. या प्रत्येक वस्तूंमागील नेमक्या संकल्पना आणि या ज्ञानाच्या जिज्ञासेतून वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला जातो.

कार्यशाळेत हे शिकवले जाते
वैज्ञानिक आधारावर काम करणारे विविध प्रोजेक्ट्स समजावून सांगणे, वर्किंग सायंटिफिक मॉडेल्स तयार करणे, मुलांमध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करणे, विविध नावीन्यपूर्ण आयडियाज एक्झिक्यूट डेमॉन्स्ट्रेट करणे आणि मुलांना या गोष्टींचा अनुभव देणे इत्यादी गोष्टी सोप्या भाषेत शिकवल्या जातात. तसेच कार्यशाळेमध्ये मुलांकडून सहज करता येतील असे वैज्ञानिक मॉडेल्सही तयार करून घेतले जातात. मुलेदेखील या गोष्टी आनंदाने करतात.

मुलांनी तयार केले मॉडेल्स
गेल्या एक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तंत्रज्ञान आधारित विविध वर्किंग मॉडेल्स तयार केले आहेत. त्यामध्ये थेअरी ऑफ मशीन, मेकॅनिकल डिझाइन बेस्ड एक्सकॅव्हेटर/जेसीबी, इलेक्ट्रॉनिक आधारित टेस्ला कॉइल प्रमेय, ऑटोमॅटिक स्ट्रिट लाइट ऑपरेटिंग सिस्टिम, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आधारित पॉवर जनरेशनच्या वर्किंग मॉडेलचा समावेश आहे. मुलांनी अवघ्या ३० रुपये खर्चामध्ये व्हॅक्यूम क्लीनर तयार केले आहे. जपानमध्ये धावणाऱ्या सर्वात वेगवान मॅग्नेटिक ट्रेनचे प्रिन्सिपल लाइव्ह वर्किंग मॉडेलही विद्यार्थ्यांनी अनुभवले आहे. त्याचप्रमाणे सोलर कुकर, डोअर आलार्म, हेलिकाॅप्टर, विमानाचे प्रिन्सिपल यासारखी अनेक उपयुक्त मॉडेल्सही बनवले आहेत.

वर्धापनदिनी मान्यवरांकडून कौतुक
याउपक्रमाला एक वर्ष झाल्याबद्दल विद्यार्थी पालकांनी मिळून या अनोख्या सायन्स क्लासचा वर्धापन दिन साजरा केला. या वेळी वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेल्सचे प्रदर्शनही मांडले. यादरम्यान प्रा. अविनाश परांजपे, इशानी परांजपे, एमआयटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले, एमआयटीचे डीन डॉ. सी. एल. गोगटे, जयश्री गोगटे, प्रा. रायपूरकर या मान्यवरांनी या अनोख्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

विविध प्रश्नांची मिळतात उत्तरे
क्लासला नियमित येत असल्याने माझ्या ज्ञानामध्ये भर पडते. विज्ञानाबद्दल जे प्रश्न पडतात त्याची उत्तरे दामधर सरांच्या क्लासमध्ये सहजपणे मिळतात. पुस्तकी ज्ञानासोबतच इथे प्रॅक्टिकलही करून दाखवले जाते. भविष्यामध्ये करिअर निवडीसाठी या क्लासची मदतच होईल. साक्षी भालेराव
इथे आम्हाला नवनवीन माहिती मिळते, प्रयोग करण्याची संधी मिळते. आमचे सर म्हणतात, प्रत्येक मुलामध्ये क्रिएटिव्हिटी नावाची गोष्ट असते. फक्त ती बाहेर काढण्याची गरज असते. मला वाटते की, आमच्यातील ही क्रिएटिव्हिटी दामधर सरांनी बाहेर काढून आम्हाला मदतच केली आहे. शौनक जोशी

काय म्हणते दांपत्य
विज्ञानतंत्रज्ञानात भारताची प्रगती आणखी वेगाने व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे गरजेचे आहे. त्याच दिशेने वाटचाल करण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेत आम्ही विज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचे काम हाती घेतले आहे. विज्ञान पेराल तर तंत्रज्ञान उगवेल यावर मला पूर्ण विश्वास आहे. प्रा.विनोद दामधर
नोकरीतूनवेळ काढत आम्ही मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हा उपक्रम व्यापक करायचा आहे. पण जागा निधीमुळे हे शक्य होत नाही. तरी जास्तीत जास्त मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आमची भूमिका राहील. प्रा.भारती दामधर
तिसरीतील चिमुकल्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत साऱ्यांची प्रा. विनोद दामधर यांच्या कार्यशाळेत अशी गर्दी होते.

शालेय शिक्षणातही होतो फायदा
माझ्याएकामित्राने क्लासबद्दल सांगितल्यावर मीसुद्धा नियमित जायला लागलो. इथे मला भरपूर शिकायला मिळाले. टेस्ला प्रिन्सिपल, सोलर सिस्टिम, मॅग्नेटिक लेव्हिटेशन प्रिन्सिपल इत्यादी गोष्टी चांगल्या रीतीने शिकता आल्या. शालेय स्तरावरही मला या शिक्षणाचा फायदा होत आहे. प्रतीक जोशी

शाळेतजे ज्ञान मिळत नाही ते मला इथे आल्यावर मिळते. ज्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला शाळेत मिळत नाहीत ती इथे मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोगही करायला मिळतात. या अनोख्या सायन्स क्लासमध्ये आम्हाला सखोल माहिती मिळाल्यामुळे ती पुढील शिक्षणासाठीही उपयुक्त ठरणार आहे. मृण्मयी कोंडपल्ले
बातम्या आणखी आहेत...