आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियंत्यावर अखेर फौजदारी दाखल होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बढती मिळावी यासाठी स्वत:च्या मूळ सेवा पुस्तिकेत खाडाखोड करणार्‍या लघु पाटबंधारे विभागातील उपविभागीय अभियंता रमेश पवार यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचे ‘डीबी स्टार’ने उघड केले. वृत्त प्रसिद्ध होताच प्रधान सचिवांनी त्याची गंभीर दखल घेत विशेष बैठक घेतली आणि याप्रकरणी स्वत: लक्ष घातले. पवार यांच्यावर
कारवाई करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. एवढेच नव्हे, तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी अंतिम पत्रही काढण्यात आले असून यासाठी दोन कर्मचार्‍यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत लघु पाटबंधारे विभागात रमेश पवार हे उपविभागीय अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांची परभणी येथील जायकवाडी प्रकल्प उपविभाग क्रमांक 7 मध्ये 4 जून 1980 रोजी कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती झाली होती. त्या वेळी त्यांनी आपल्या मूळ सेवा पुस्तिकेत खाडाखोड करून एक जन्मतारीख नोंदवली. पुढे 1989 मध्ये उस्मानाबाद येथे शाखा अभियंता पदावर असताना त्यांनी आपल्या सेवा पुस्तिकेत खाडाखोड करून आपली जन्मतारीख पुन्हा खाडाखोड करून बदलली. पुढे 2004 मध्ये ते औरंगाबादेत लघु पाटबंधारे विभागात उपविभागीय अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर माहितीच्या अधिकारात हे प्रकरण उघडकीस आले. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत पवार दोषी आढळून आले, पण या सर्व प्रक्रियेत चौकशी अधिकार्‍याने दिलेली कारवाईची मुदतही संपली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ‘डीबी स्टार’ने याप्रकरणी तपास केला असता हे प्रकरण जुने असल्याचे मान्य करत त्याची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठांनी दिली. उपविभागीय अधिकार्‍यांच्या या दबंगगिरीविरुद्ध तक्रारदार नंदकिशोर दरक यांनी गेल्या आठ वर्षांपासून कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी संचालक, तर थेट प्रधान सचिवांपर्यत सगळ्या पातळ्यांवर तक्रारी दाखल केल्या होत्या, पण कुणीही त्याची दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी ‘डीबी स्टार’ कडे कै फियत मांडली. चमूने यावर 30 मे रोजी ‘अभियंता दोषी तरी नव्याने चौकशी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले.

वृत्त प्रसिद्ध होताच बैठक
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्य अभियंता जी. एस. लोखंडे यांनी पुराव्यासह जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांच्याकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला. प्रधान सचिवांनी अवर सचिव मंदार कर्णिक यांच्यामार्फत पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य अभियंता व कार्यकारी संचालकांना दिले. यामुळे अधीक्षक अभियंता ए. आर. कांबळे यांनी तत्काळ पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले, तर कार्यकारी अभियंत्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांकडे गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी उपअभियंता टी. आर. बोंद्रे, प्रथम लिपिक जे. ए. रोंगे, वरिष्ठ लिपिक डी. एल. साळवे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.