आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी परीक्षा 27 मेपासून, रिड्रेसलचा निकाल लांबल्यामुळे परीक्षांना दोन आठवडे विलंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभियांत्रिकीच्या परीक्षा १४ मे ऐवजी २७ मेपासून सुरू होणार आहेत. ‘रिड्रेसल’चा निकाल लांबल्यामुळे परीक्षांना दोन आठवडे विलंब होत आहे. निकाल मात्र दोन आठवडे आधीच घोषित करण्याचा संकल्प परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी केला आहे. १८ मेपूर्वी ‘रिड्रेसल’चा निकाल जाहीर होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
अभियांत्रिकीच्या निकालानंतर रिड्रेसलसाठी यंदा विक्रमी १८,७०६ जणांनी अर्ज केले. आधीच परीक्षा विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असताना त्यात ‘रिड्रेसल’चा डोंगर उभा राहिला आहे. तरीही डॉ. सरवदे यांनी अभियांत्रिकी प्रथम वर्षांचा ‘रिड्रेसल’ निकाल जाहीर केला आहे. प्रथम वर्षांसाठी ४३७३ विद्यार्थ्यांचा रिड्रेसलचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षांचा रिड्रेसलचा निकाल १८ मेच्या आत जाहीर होईल. त्यासाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती चारही जिल्ह्यांच्या महाविद्यालयांना शनिवारीच रवाना करण्यात आल्या.
पुढील आठवड्यात म्हणजेच १८ मेदरम्यान सर्व विषयांचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, २३ परीक्षा केंद्रांवर सुरू होणाऱ्या १४ मेपासूनच्या अभियांत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आधीच्या वेळापत्रकानुसार १४ मे ते जूनपर्यंत परीक्षा होणार होत्या. आता २७ मे रोजी परीक्षा सुरू होऊन २० जून रोजी संपणार आहेत.
पण निकाल वेळेतच देऊ : मागीलवर्षी रिड्रेसलसाठी खूपच कमी अर्ज आले होते. यंदा दुप्पट अर्ज आले आहेत. मागील वर्षी निकाल १५ ऑगस्टनंतर घोषित केले गेले. यंदा मात्र दोन आठवड्यांचा विलंब असूनही ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर करू, असे परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.

विधीचे निकाल २५ दिवसांत
विधीविषयाच्या सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. नियमाप्रमाणे ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. विधीच्या परीक्षा ३० मार्च रोजी संपल्या असून २५ एप्रिल रोजी २३ हजार ७७ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. शिवाय एमएस्सी बायोफिजिक्स, हर्बल टेक्नॉलॉजी आदींसह अन्य काही विषयांचेही निकाल गुरुवारी (७ मे) जाहीर करण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...