आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीसीएम ग्रुपनुसारच अभियांत्रिकीची यादी; 5 जुलै रोजी लागणार तात्पुरती गुणवत्ता यादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सोमवारपासून प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. 3 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज विक्री सुरू राहणार असून एआरसीला जाऊन नोंदणी निश्चित करता येईल, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी पीसीएम ग्रुप अर्थात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ विषयांतील गुणांवरच जाहीर होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशपातळीवर जेईई मेन्सच्या गुणांद्वारे प्रवेश प्रक्रिया केली जात आहे. यंदा बारावीचे गुण आणि जेईई मेन्स परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे. पूर्वी केवळ राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारावरच ही प्रवेश प्रक्रिया होत असे. परंतु गेल्या वर्षीपासून या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार यंदा ज्या केंद्रावर विद्यार्थी नोंदणी करणार आहेत, त्याच ठिकाणी अ‍ॅप्लिकेशन किटमध्ये त्यांना युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. जेणेकरून घरबसल्यादेखील विद्यार्थी अर्ज भरू शकतील.
व्होकेशनल विषयदेखील प्रवेशासाठी गृहीत
अर्ज प्रक्रियेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथबरोबरच व्होकेशनल विषयदेखील प्रवेशासाठी गृहीत धरला जाईल, असे सांगण्यात आले होते. या नियमानुसार विद्यार्थी केवळ अर्ज करण्यास पात्र होईल. मात्र पीसीएम तसेच जेर्ईई मेन्सचे मिळून जे पर्सेंटाइल येईल त्या आधारावरच प्रवेश निश्चित होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क सवलत
आतापर्यंत एससी, एसटी आणि अपंग तसेच इतर मागास विद्यार्थ्यांना शासनातर्फे शुल्कात सवलत मिळत असे. आता खुल्या गटातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीही ट्यूशन फी सवलत लागू करण्यात आली आहे. यानुसार अर्ज प्रक्रियेतील सवलतीचा कोड विद्यार्थ्यांना निवडायचा असून या विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के जागा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी साडेचार लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍या विद्यार्थ्यांना उत्पनाचा दाखला सादर करावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्र
आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी इंटरनेट कॅफेवर विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेण्यात येतात. त्यामुळे सर्व आरआरसी केंद्रावर 50 रुपये शुल्क आकारून अर्ज भरून देण्याची सुविधा स्वतंत्ररीत्या करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त केंद्रावर अधिक शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी सूचनाही देण्यात आल्या आहेत.
एसएमएस अलर्ट
अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी नोंदणी आॅनलाइन करायची आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेली अ‍ॅडमिशन किट विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर त्या किटमध्येच एक नंबर देण्यात येईल. तो स्क्रॅच केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. ही सर्व आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पुढील सर्व सूचना एसएमएसद्वारे देण्याची सुविधादेखील करण्यात आली आहे.