आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी प्रवेश : चांगले गुण घेऊन चूक केली काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले गुण घेऊन इंजिनियर व्हायचे स्वप्न पाहणार्‍या राज्यातील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांवर यंदा अन्याय झाला आहे. प्रवेश प्रक्रियेतील बाद पद्धतीमुळे अभियांत्रिकीची हवी ती शाखा व पाहिजे ते महाविद्यालय त्यांना मिळाले नाही. याउलट कमी गुण असणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना मात्र लॉटरी लागली आहे. बाद पद्धतीमुळे त्यांना तिसर्‍या फेरीत हवे ती शाखा व हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. दुसरीकडे तब्बल साडेबारा हजार विद्यार्थ्यांना डोमिसाइल प्रमाणपत्र नसल्याने प्रवेशाला मुकावे लागले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड गोंधळ उडाला आहे. ही प्रवेश पद्धत सदोष असल्याची ओरड पालक करत आहेत. यात असलेली बाद पद्धत अनेक विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण करत आहे. निदान पुढच्या वर्षी तरी ही पद्धत बदला, अशी मागणी पालकांनी केली आहे. गुणवंतांवर अन्याय झाला असूूून अक्षरश: 47 टक्के मिळवणार्‍या विद्यार्थ्यालाही चांगले महाविद्यालय तिसर्‍या फेरीत मिळाले, तर 80 ते 90 टक्के गुण असणार्‍या अनेक मुलांना मात्र पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केल्याने पाहिजे तो विषय, पाहिजे ते महाविद्यालय अन् पाहिजे ते गाव न मिळाल्याने हे विद्यार्थी नाराज झाले आहेत.

बाद पद्धतीने करिअर बरबाद

महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण संचालनालयाने ऑनलाइन पद्धतीने नुकतेच प्रवेश केले आहेत, परंतु ही प्रवेश पद्धतच सदोष असल्याचा आक्षेप काही सुजाण नागरिकांनी आधीच केली होती. त्याची कुठलीही दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे खर्‍या गुणवंतांवर यंदा अन्यायच झाला आहे. 11 जून रोजी सर्वप्रथम डीबी स्टारने या प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करून या प्रकाराला वाचा फोडली होती. यंदा आयआयटी व एनआयटीचे प्रवेश लांबल्यानेही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे या वृत्तात नमूद केले होते. एकदा पहिल्या फेरीत प्रवेश घेतला की तो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतूनच बाद करण्याच्या पद्धतीवरच पालकांचा आक्षेप आहे. याची दखल न घेतल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे करिअर बरबाद झाले. चांगले गुण मिळवूनही पाहिजे तो विषय व कॉलेज त्यांना मिळाले नाही. बाद पद्धत शासनाने बाद करावी, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात कट ऑफ एवढे घसरले की अभियांत्रिकीचे प्रवेश खरोखरच गुणवत्तेप्रमाणे होतात की जुगारी पद्धतीने, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. औरंगाबाद येथे कॉम्प्युटर शाखेचे कट ऑफ दुसर्‍या फेरीत 11 गुणांनी, तर तिसर्‍या फेरीत तब्बल 49 गुणांनी घसरले. तिसर्‍या फेरीत 5 जागा उपलब्ध होत्या.इलेक्ट्रिकलचे कट ऑफ दुसर्‍या फेरीत 1 गुणाने, तर तिसर्‍या फेरीत 47 गुणांनी घसरले.

साडेबारा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले

यंदा डोमिसाइल नसल्याने तब्बल साडेबारा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश शासनाने नाकारले आहेत. डीटीई अर्थात डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या साइटवर या विद्यार्थ्यांची यादीच लावली आहे. विद्यार्थी व त्यांचे पालक म्हणतात हा शासनाचा दोष आहे. आम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट लवकर मिळत नाही, तर हे सर्टिफिकेट आधीच काढून ठेवावे असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ऐनवेळी ते काढले तर असा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मुलगा अकरावीमध्ये गेल्यावर लगेच सर्टिफिकेट काढण्यासाठी हालचाली सुरू कराव्यात.

या दोन तक्त्यांवरून स्पष्ट होते प्रक्रिया

शासकीय अभियांत्रिकी, औरंगाबाद येथील स्थिती
विषय राउंड 1 राउंड 2 राउंड 3
सिव्हिल 138 134 121(60.5
कॉम्प्युटर 142 131 93(46.5)
आय.टी. 133 125 93(46.5)
इलेक्ट्रिकल 145 144 98(49.4)
मेकॅनिकल 159 158 144(72)
इलेक्ट्रॉनिक्स 147 148 95(47.5)

हा तक्ता पाहा (यात खुल्या वर्गाचे कट ऑफ दाखवले आहेत) शासकीय अभियांत्रिकी कॉलेज पुणे(सीओईपी)--- एकूण गुण 200 पैकी
विषय राउंड 1 राउंड 2 राउंड 3
सिव्हिल 167 162 140(70 })
कॉम्प्युटर 181 171 144(72 })
आयटी 170 163 133(66.5 })
इलेक्ट्रिकल 172 169 140(70 })
इलेक्ट्रॉनिक्स 178 170 138(69 })
इन्स्ट्रुमेंटेशन 170 166 129(64.5)
मेकॅनिकल 181 172 154(77)
प्रॉडक्शन 165 158 129(64.5)
मेटलर्जी 153 144 120(60)
प्लॅनिंग 137 126 94(47)

अशी झाली प्रवेश प्रक्रिया
वरील दोन्ही तक्त्यांमध्ये खुल्या वर्गाचे कट ऑफ फेरीनिहाय दाखवलेले आहेत. वरील दोन तक्त्यांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, दुसर्‍या राउंडचे मेरिट थोडे घसरले आहे, पण तिसर्‍या राउंडमध्ये अगदी कहरच झाला आहे.उदा. सीओईपी कॉम्प्युटर शाखेचे मेरिट दुसर्‍या फेरीत दहा गुणांनी घसरले, तर तब्बल 60 जागांपैकी तिसर्‍या फेरीत सीओईपीत कॉम्प्युटर शाखेच्या तब्बल 17 जागा रिक्त होत्या. विद्यार्थ्यांची प्रथम पसंती असलेल्या मेकॅनिकल शाखेचे मेरिट दुसर्‍या फेरीत 9 गुणांनी, तर तिसर्‍या फेरीत 27 गुणांनी घसरले. तिसर्‍या फेरीत मेकॅनिकल शाखेच्या 7 जागा सीओईपीत उपलब्ध होत्या.

काय म्हणतात पालक

अभ्यासाचा काय उपयोग?
माझ्या मुलाला 200 पैकी 140 गुण मिळाले. पहिल्या राउंडलाच आम्ही प्रवेश निश्चित केल्याने मुलाचे नुकसान झाले. त्याला पुणे शहरात आयटी शाखेला प्रवेश घ्यावा लागला, पण पुढच्या राउंडला मेरिट खूप खाली गेले. 105 गुण असणार्‍यांना इलेक्ट्रिकल मिळाले. कॉम्प्युटर तर 93 गुण असणार्‍यांना मिळाले. मग अभ्यास करून चांगले गुण घेऊन काय उपयोग? परीक्षेऐवजी आता अँडमिशन प्रक्रियेचा जास्त अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
महेश अष्टपुत्रे,पालक

नाहक खर्च वाढला
माझ्या मुलाला 200 पैकी 113 गुण आहेत. पहिल्या राउंडला आम्ही पुण्यातील सिंहगडला प्रवेश घेतला, पण पुढे तिसर्‍या राउंडला व्हीआयटीला प्रवेश मिळू शकत होता. मात्र बाद पद्धतीने नुकसान झाले. पुण्यात प्रवेश घ्यावा लागल्याने एक लाख रुपये वर्षाचा खर्च आणखी वाढला आहे.
चंद्रशेखर मुळे, पालक

प्रोसेसचा अभ्यास केल्याने फायदा
या प्रवेश पद्धतीचा अभ्यास केल्याचा मला फायदा झाला. माझ्या मुलीला 109 गुण आहेत आम्ही पहिल्या दोन राउंडला प्रवेश घेतलाच नाही. तिसर्‍या राउंडला मात्र आम्हाला औरंगाबादलाच इलेक्ट्रिकल शाखा मिळाली. आम्ही रिस्क घेतल्यामुळे हे शक्य झाले.
विजय बोर्डे ,पालक

पुन्हा याचिका दाखल करणार
आम्ही काही पालकांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, पण अँडमिशन प्रोसेस बरीच पुढे गेल्याने खंडपीठाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. पुढच्या वर्षी तरी असा घोळ होऊ नये तसेच बाद पद्धत बंद करून त्यात सुधारणा करावी, अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका आम्ही पुन्हा करणार आहोत.
प्रा. श्रीकांत कलंत्री, करिअर काउन्सेलर, अभियांत्रिकी

थेट सवाल

एस.व्ही. परांजे
प्रशासकीय अधिकारी, सहसंचालक कार्यालय, तंत्रनिकेतन

यंदा अनेक गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
मुळीच नाही. मला असे वाटत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही ही प्रवेश प्रक्रिया राबवतो आहोत. यात पालकांनीच प्रक्रियेचा अभ्यास करायला हवा.
पालक म्हणतात हा निव्वळ जुगार झालाय.
असे कसे म्हणता येईल? आम्ही अत्यंत जबाबदारीने ही प्रक्रिया राबवतो आहोत. उलट ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी केली आहे. पूर्वी नऊ विकल्प भरून द्यावे लागत, आता फक्त तीन विकल्प आहेत.
गुणवंत विद्यार्थी व पालक नाराज आहेत.
आम्ही सुरुवातीला मॉक राउंड घेतला होता. त्यात पालकांना सर्व प्रक्रियेची माहिती दिली. तेथेच हा विषय समजतो. नंतर कुणा एका पालकासाठी ही सर्व प्रक्रिया बदलणे अवघड आहे. हा सर्व कार्यक्रम उच्च् शिक्षणमंत्र्यांपासून सर्वांना दाखवला जातो.
बाद पद्धतीने अनेकांचे नुकसान झाले.
बाद पद्धतीमुळे प्रवेश सोपे होतात. तसे केले नाही तर ही प्रक्रिया ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत चालेल. त्यामुळे आम्ही ती बदलू शकत नाही.
डोमिसाइल नसल्यानेही अनेकांचे नुकसान झाले आहे..
याला आम्ही काही करू शकत नाही. पालकांनी अकरावीत मुलगा गेल्यावर ते काढून ठेवायला हवे. तसेच जात वैधता प्रमाणपत्रही काढून ठेवावे.