आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ‘आरटीओ’ची संधी, राज्यात हजार जागा भरणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: पूर्वी आरटीओ अधिकारी होण्यासाठी अवजड वाहन चालवण्याचा परवाना वर्कशॉपमध्ये एक वर्षाचा अनुभव अशी अट होती. ती आता रद्द करण्यात आली आहे. नवीन निर्णयाप्रमाणे अभियांत्रिकी, मेकॅनिकल इंजिनिअरलाही ही संधी उपलब्ध झाली आहे. याविषयी राज्य परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला हा निर्णय कळवला आहे. 
 
ऑटोमोबाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आरटीओ इन्स्पेक्टर पदाच्या एक हजार जागा भरण्याची सरकारने घोषणा केली आहे. परिवहन विभागात सहायक मोटर वाहन निरीक्षकांची पदे पहिल्यापासून केवळ मेकॅनिकल ऑटोमोबाइल अभियांत्रिकी उमेदवारांसाठी राखीव होती. या अटी शर्तींमुळे मोठ्या संख्येने बेरोजगार अभियंत्यांना इच्छा असूनही परीक्षेला अर्ज करता येत नव्हता. ही अटच परिवहन प्रशासनाने शिथिल केली आहे. शिवाय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन डिप्लोमा अथवा पदवीधारकांसह डीएमई, डीएई, बीई, बीटेक, मेकॅनिकल, ऑटोमोबाइलच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांनाही या पदासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. 
 
एक हजार पदे टप्प्याटप्प्याने भरणार : आरटीओ अधिकारी पदाची परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली नाही तर लवकरच सहायक आरटीओ अधिकारी पदासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. यातून टप्प्याटप्प्याने हजार उमेदवारांना अधिकारी होण्याचा मार्ग खुला झाला आहे. एवढ्या प्रमाणात पुन्हा जागा निघण्याची शक्यताही धूसर आहे. 
 
अवजड वाहन दुरुस्ती अवजड वाहन चालवण्याचा परवाना ही अट रद्द केली तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी एलएमव्ही (लाइट मोटार व्हेइकल) म्हणजेच हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना अनिवार्य केला आहे. त्यानुसार परीक्षेला बसण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी हा परवाना काढणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, हेही लक्षात ठेवावे.
 
कायमस्वरूपी लायसन्ससाठी कमीत कमी एक महिना तात्पुरत्या स्वरूपात लायसन्सवर कार चालवण्याचा अनुभव आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयार व्हावे, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी केले आहे.