आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडच्या तरुणी औरंगाबादच्या प्रेमात; दंतोपचाराच्या विशेष उपक्रमासाठी निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- इंग्लंडच्या दोन विशीतल्या तरुणी एकट्याच शहरात धडकल्या आहेत. दोन्ही तरुणी दंतशास्त्राचे वैद्यकीय शिक्षण घेत असून पदवी अभ्यासक्रमामध्ये शेवटच्या वर्षाला असलेल्या ‘शॉडोइंग’ या विशेष उपक्रमासाठी त्यांनी शहर गाठले आहे. विशेष म्हणजे दोघींचे मूळ हे भारतात असल्याने त्या भारताकडे आकृष्ट झाल्या आहेत. औरंगाबाद शहरात गर्दी-आवाज-प्रदूषण-धूळ-उष्णता असे सर्व काही असले तरी औरंगाबाद व शहरालगतची पर्यटनस्थळे, औरंगाबादकर नागरिक आणि एकूणच अस्सल भारतीय संस्कृतीच्या त्या प्रेमात पडल्या आहेत.

रिह्या पटेल व सेजल संगेनी या तरुणी लंडनच्या विख्यात किंग्ज कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थिनी. इंग्लंडमध्ये शेवटच्या वर्षाला असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘श्ॉडोइंग’ हा खास उपक्रम अलीकडे नव्यानेच सुरू झाला आहे. या उपक्रमामध्ये त्या-त्या शहरातील वैद्यकीय महाविद्यालये, क्लिनिकला भेट देऊन संपूर्ण आठवडाभर निरीक्षण-प्रत्यक्ष पाहणीतून अभ्यास करणे अपेक्षित आहे.

दोघींचे आजी-आजोबा कित्येक दशकांपूर्वी गुजरात सोडून गेले आणि त्यानंतर नेहमीसाठीच इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. आता तर दोन्ही कुटुंबे इंग्लंडची नागरिक झाली असून रिह्या व सेजलचा जन्मही तिकडेच झाला आहे. दोघींचे आतापर्यंतचे आयुष्य इंग्लंडमध्ये गेले असले तरी भारताबद्दलच्या अनामिक ओढीने त्यांना औरंगाबादपर्यंत आणले. त्या औरंगाबादआधी थायलंड व व्हिएतनाम फिरून आल्या. या उपक्रमासाठी कॉलेजतर्फे 100 पाउंड दिले जातात; पण तेवढय़ा रकमेत भारतात येणे शक्य नसल्याने स्वखर्चाने त्या औरंगाबादपर्यंत आल्या आहेत. संपूर्ण आठवडा त्या सिडकोतील ‘स्माइल केअर’ क्लिनिकमध्ये अनुभव घेत आहेत.