आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घेई छंद वनाचा आनंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चहुबाजूंनी हिरवेगार डोंगर आणि छोट्या छोट्या टेकड्यांची महिरप, नैसर्गिक चढउताराचे आणि नागमोडी वळणाचे रस्ते. त्यात जागोजागी पायथ्याशी साचलेली छोटी छोटी तळी.. या नैसर्गिक वातावरणाचा उपयोग करीत वन विभागाने खास निसर्ग पर्यटन केंद्र उभे केले आहे. देवळाई चौकापासून साधारण 4 किमी अंतरावरील वनराईत हे केंद्र आहे. माळरानावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करून विभागाने खर्‍या अर्थाने वनाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. लहानांसाठी खेळण्यांची व्यवस्था करून त्यांना या वनोद्यानात स्वच्छंदपणे हुंदडण्याची संधी या ठिकाणी आहे. सोबतीला वनभोजन करून भन्नाट मौजमस्ती करतानाच निसर्गाचा आनंद लुटण्याची सोय विभागाने केली आहे.

शहरालगत देवळाई-गांधेली शिवारातील डोंगराच्या कुशीत शहरी लोकांबरोबर आसपासच्या ग्रामस्थांनाही एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवता यावा यासाठी वन विभागाने या निसर्ग पर्यटन केंद्र व वनोद्यानाची व्यवस्था केली आहे. यासाठी देवळाई, सातारा, सिंदोन-भिंदोन, शिवगड तांडा, परदरी, चिंचोली, कांचनवाडी, नक्षत्रवाडी आदी गावांमध्ये 1 हजार 16 हेक्टर पैकी वन विभागाचे या विभागात 120 हेक्टर क्षेत्र आहे. यातील 25 हेक्टरमध्ये साई टेकडी, रोपवाटिका व वनोद्यान साकारण्यात आले आहे. यात बालोद्यान निसर्ग पर्यटन केंद्र 9 हेक्टरवर उभे आहे.

खेळण्यांसाठी 8 लाखांचा खर्च
सन 2011 मध्ये 9 हेक्टर क्षेत्रावर बालोद्यान निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी पावसाळ्यात 2 मीटर उंचीची 50 हजार रोपांची लागवड करण्यात आली. चांगल्या प्रकारे त्यांची वाढ झाल्याने आता या भागात विविध रानप्राण्यांचे वास्तव्य जाणवायला लागले आहे. वनोद्यानाला लागून 1 हेक्टर क्षेत्रावर 8 लाख रुपये खर्च करून बच्चेकंपनीसाठी विविध खेळण्या बसवण्यात आल्या.

देखभालीसाठी संयुक्त समिती
हे निसर्ग पर्यटन केंद्र, वनोद्यान व धार्मिक स्थळांची देखभाल करण्यासाठी देवळाई-गांधेली येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. गांधेलीचे सरपंच विजय सावंत हे समितीचे अध्यक्ष, तर काही ग्रामस्थ हे या समितीचे सदस्य आहेत.

लोकसहभागातून वृक्षारोपण
लोकसहभागातून या वनोद्यानात निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यासाठी 25 हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकारच्या उंचीची विविध रोपांची व झाडांची लागवड करण्यात आली. शिवाय पूर्व पावसाळी कामे वन विभागाने आता हाती घेतली आहेत. येथे येणार्‍या पर्यटक आणि भाविकांसाठी निवासाची सोय, पार्किंगची व्यवस्था, उपाहारगृहे, स्टॉल, पिण्याचे पाणी आदी सुविधा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. .

‘समाधान’ देणारा परिसर
वन विभागाच्या या केंद्रामागेच साईबाबांचे समाधान नावाचे मंदिर आहे. या मंदिराचा परिसर पावन भूमी म्हणून ओळखला जातो. साईंच्या चरणस्पर्शाने ही भूमी खर्‍या अर्थाने पावन झालेली आहे. सिकंदराबाद येथील रहिवासी कोंडुरी कोमेश्वरराव यांनी या ठिकाणी आंध्र विद्यापीठातील प्राध्यापक वेंकटराव यांच्या मदतीने 19 जुलै 2007 मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे केली. वन विभागाचे कर्मचारी साईनाथ नरोडे व सिंदोन गावातील ग्रामस्थांनी रात्रंदिवस येथे काम करून बांधकाम केले. जुलै 2012 मध्ये गांधेली डोंगराच्या याच मंदिराच्या पायथ्याशी साईबाबांची 25 फूट मूर्तीची स्थापना कामेश्वरराव यांच्या हस्ते करण्यात आली.

नवग्रह आणि अन्य मूर्ती
मंदिराच्या चबुतर्‍यावर नऊ ग्रहांच्या छोटेखानी मूर्ती दिसतात. शिवाय समाधान मंदिराच्या गाभार्‍यात र्शी दत्तगुरू, स्वामी सर्मथ, गजानन महाराज, राघवेंद्र स्वामी, भगवानबाबा, र्शीपादर्शीवल्लभ, दुर्गादेवी आदी देवतांच्या मूर्ती आहेत.

नैसर्गिक क्षेत्र असल्यानेच उभारले केंद्र
देवळाई, गांधेली आणि लगतच्या सातारा परिसराला निसर्ग पर्यटन केंद्राचा दर्जा मिळावा यामागे कुठलेही आर्थिक गणित नाही. म्हणजेच या वनोद्यानात मोफत प्रवेश आहे. गांधेली डोंगराच्या कुशीत साई टेकडी म्हणून प्रसिद्ध झालेल्या तसेच समाधान मंदिराला भेट देणार्‍या भाविकांची संख्या वाढली. हा सगळा परिसर नैसर्गिकरीत्या वनासारखाच आहे. त्यामुळे या ठिकाणी निसर्ग पर्यटन केंद्र व वनोद्यान उभारण्यात आले.
आर. एस. दसरे, वन परिक्षेत्र अधिकारी