आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entrepreneurs, Workers Union Communication Program In Aurangabad

कामगारांनीही उद्योजक व्हावे, राम भोगले यांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कारखान्यात आपण काम करणाऱ्या कामगारांकडून आपल्या मुलांनीही तेच काम करावे, अशी अपेक्षा का केली जात आहे. नव्या संकल्पना, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ते साकार करण्याचे माध्यम म्हणजे ऑटोक्लस्टर आहे. त्यामुळे कामगार त्यांच्या मुलांनीही उद्योजक होण्याची स्वप्ने पाहावीत, असा आशावाद प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले यांनी जागवला. रविवारी उद्योजक, कामगार युनियनचे नेते आणि कामगार यांच्यासाठी आयोजित संवादादरम्यान ऑटोक्लस्टरची संकल्पना स्पष्ट करण्यात आली.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील मराठवाडा ऑटोक्लस्टरमध्ये आयोजित "डेस्टिनेशन मराठवाडा फॉर मेक इन इंडिया' या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप रविवारी उद्योजक आणि कामगार वर्गातील संवादाच्या कार्यक्रमाने झाला. ऑटोक्लस्टरचा उद्देश, नवीन तंत्रज्ञान कसे उपयोगाचे आहे याची माहिती या परिसंवादात कामगारांना देण्यात आली.
विकासासाठी सारे एकत्र
मिलिंद कंक म्हणाले की, आपल्यातील कौशल्य विकसित करणे आणि नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे यातूनच आपण विकास साधू शकतो. या क्लस्टरच्या माध्यमातून कामगारांनी तंत्रज्ञान शिकले पाहिजे. सिटूचे नेते कॉ. उद्धव भवलकर म्हणाले की, गेली अनेक दशके विकसित राष्ट्रांनी देशाला केवळ उत्पादित वस्तूंची बाजारपेठ बनवून लुटले आहे. मात्र मेक इन इंडियाच्या माध्यमातून येथे उद्योग उभारले जाणार ही आनंदाची बाब आहे. कामगार सेनेचे प्रभाकर मते म्हणाले की, ऑटोक्लस्टरच्या संकल्पनेपासून ते साकारण्यापर्यंतचे आम्ही साक्षीदार आहोत. हे क्लस्टर कामगारांकरिता उपयुक्त आहे.
मंदी येणाऱ्या क्षेत्रात उत्पादन गरजेचे
मेक इन इंडियाच्या माध्यमातून तीन लाख कोटींच्या उत्पादनाची निर्मिती होणार आहे. देशातली २०० शहरे या स्पर्धेत आहेत. एकाच औद्योगिक क्षेत्रात मंदी आली तर त्याचा आपल्यावर परिणाम नको. त्यामुळे संरक्षण, रेल्वे अशा मंदी येणाऱ्या क्षेत्रात उत्पादन करणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान दहा हजार कोटींची गुंतवणूक यावी यासाठी आपण प्रयत्नशील असून एक नवा पर्याय निर्माण करू, असेही भोगले म्हणाले.
तंत्रज्ञान स्वीकारा; घाबरू नका
भोगले म्हणाले की, १९८४ पूर्वी औरंगाबादची औद्योगिक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराअभावी भरभराटीला आलेल्या कंपन्याही बंद पडल्या आहेत. त्यामुळे तुम्ही अपग्रेड व्हा. नवीन काय आहे हे शोधून काढण्याची मनीषा कायम बाळगली पाहिजे. बदल स्वीकारणे म्हणजे कमीपणा नसून नवेपणा स्वीकारणे हा आयुष्याचा भाग आहे. कारखान्यात येण्यापूर्वी किती लोकांनी कारखाना पाहिला होता. मात्र तरीही सारे जमतेच ना. जमत नाही असे काही नसते. फक्त बदलाला घाबरू नका. स्वप्ने बघायला शिका. तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होतात हा गैरसमज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.