आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉलमध्ये स्वस्त दरात वस्तू मिळतील असा लोकांचा विश्वास आहे. काही वस्तूंबाबत तसे घडतेदेखील. मात्र, काही वस्तूंचे एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारण्याचा प्रकार ‘इझी डे’मध्ये होत आहे. सहा-सातवेळा असे घडले; परंतु ही तांत्रिक चूक असल्याचा कंपनीचा दावा आहे. डीबी स्टारकडे तक्रार आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
शहानूरवाडी परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथे राहणार्या देविदास देसाई यांनी या मॉलमधून युनिलिव्हर कंपनीचे 100 एमएल पाँड्स ट्रिपल व्हिटॅमिन मॉइश्चरायझर क्रीम विकत घेतले, ज्याची सर्व करासहित (एमआरपी) छापील किंमत 49 रुपये असताना 54 रुपये घेण्यात आले. तशी पावतीही देण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच चिडलेल्या देसाई यांनी भांडार व्यवस्थापकांची भेट घेऊन हा प्रकार लक्षात आणून दिला. मात्र, त्यांनी आमचा व्याप फार मोठा आहे. त्यामुळे चुका होऊ शकतात. तरीदेखील आम्ही त्वरित सुधारणा करू, असे म्हणत देसाई यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी देसाई यांच्याकडून क स्टमर फीडबॅक फॉर्म भरून घेतला. यात देसाई यांनी स्टोअरमध्ये झालेल्या अनुभवाची नोंद केली आहे.
आठवड्यानंतर तोच अनुभव
देसाई पुन्हा 11 जानेवारीला याच स्टोअरमध्ये गेले. त्या वेळीही त्यांना पुन्हा हाच अनुभव आला.अखेर देसाई यांनी याप्रकरणी डीबी स्टारकडे आपली कैफियत मांडली. एवढेच नव्हे तर आपल्या तक्रारीबाबत लेखी निवेदनही दिले. त्यानंतर चमूने या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केला. त्या वेळी विशिष्ट वस्तूची किंमत एमआरपीपेक्षा जास्त वसूल केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
एमआरपी 49, पण पावती मात्र 54 रुपयांची
शहानूरमियां दर्गा परिसरातील ‘इझी डे’ मॉलची डीबी स्टार चमूने पाहणी केली. मॉलमध्ये ज्या रॅकवर क्रीम ठेवले होते त्याच्यासमोर 54 रुपये किमतीचे लेबल लावले होते. त्या वस्तूवर एमआरपी मात्र 49 रुपये एवढीच आहे. यावरून काय प्रकार होत आहे हे उघड झाले. मॉलच्या उद्घाटनाच्या दिवशीदेखील असाच प्रकार घडला होता.
तीन दिवस चार वेळा तपास
13 जानेवारी, वेळ : 5 :44
प्रतिनिधी व अभिजित गोळे नावाची व्यक्ती आता ही वस्तू खरेदी करण्यासाठी ‘इझी डे’ मध्ये गेली. दोघांनाही 49 रुपयांच्या या वस्तूचे 54 रुपयांचेच बिल देण्यात आले.
12 जानेवारी, वेळ: 12:56
सरस्वती भुवन महाविद्यालयाची एका विद्यार्थिनीने हेच क्रीम खरेदी केले. तिलाही मॉलतर्फे 54 रुपयांचीच पावती देण्यात आली.
11 जानेवारी, वेळ : 6 :44
शहरातील विधिज्ञ अँड.संतोष लोखंडे यांनी हीच वस्तू खरेदी केली तेव्हा त्यांच्यासोबतही हाच प्रकार झाला.
11 जानेवारी, वेळ : 11:10
चमूने देविदास देसाई यांनाच ग्राहक बनवून पाठवले व हे पाँड्स क्रीम खरेदी केले. त्याची छापील किंमत होती 49 रुपये. पण देसाई यांना पावती मात्र 54 रुपयांची देण्यात आली. तेवढेच पैसेही वसूलही केले गेले.
डीबी स्टारने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तीन दिवस खास तपासचक्र फिरवले. त्यातून धक्कादायक प्रकार समोर आला.
उद्घाटनाच्या दिवशीही असाच प्रकार
राजू पवार या ग्राहकाने उद्घाटनाच्या दिवशीच या मॉलमधून 40 ग्रॅम कोलगेट टूथपेस्ट खरेदी केले. पेस्टवर 70 रुपये एमआरपी असताना त्यांना 74 रुपयांचे बिल देण्यात आले. 70 रुपये किंमत असताना आपल्याकडून 4 रुपये जास्त घेतल्याचे पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मॉलचे व्यवस्थापक सुभाशीष यांच्याकडे तक्रार केली. त्या वेळी 4 रुपये परत घ्या आणि विषय मिटवा, असे म्हणत पवार यांची खिल्ली उडवण्यात आली. त्या वेळी ‘तांत्रिक’ चूक झाली, असे म्हणत मॉलमधील अधिकार्यांनी हा विषय धकवून नेला. पण आता पुन्हा तोच प्रकार एकदा नव्हे, तर चार वेळा घडला आहे.
थेट सवाल-
स्मिता नायर
‘इझी डे’ कॉर्पोरेट अफेअर्सच्या उपमहाव्यवस्थापक
‘इझी डे’मध्ये एमआरपीपेक्षा जास्त किंमत आकारली जात आहे.
पाँड्स लोशनबाबत असे घडल्याची माहिती मी घेतली आहे. मात्र, ही तांत्रिक चूक आहे.
वारंवार हा प्रकार कसा काय घडतो ?
एकाच वस्तूबाबत हा प्रकार घडला आहे.
-याआधी टूथपेस्टबाबतही हेच घडले होते. पुन्हा होणार नाही असे आपण म्हणाला होता..
आता मला आठवले. याआधी हे घडले होते. पण ही एक तांत्रिक चूक आहे. त्याबद्दल ग्राहकांची माफी मागते.
-तांत्रिक चुकीत किंमत वाढतेच का ? शिवाय सहा-सात वेळा हा प्रकार झाला आहे.
किंमत कमीसुद्धा होत असेल, पण ती गोष्ट पुढे येत नसावी. पण मी आताच संबंधितांशी बोलते. ग्राहकांना सवलतीत वस्तू देण्यावर आमचा जोर आहे. जास्त पैसे घेणे हा आमचा मुळीच उद्देश नाही. चूक दुरुस्त करू.
ही मनमानी थांबवा
-ग्राहकांना मोठमोठय़ाजाहिराती करून गळ घातली जाते. त्यातूनच लोकांना लुटण्याचा हा प्रकार सुरू आहे. एमआरपीपेक्षा जास्त किंमत आकारून आमचीही लूट झाली. या विक्रेत्याची मनमानी थांबावी म्हणूनच आम्ही हे प्रकरण लावून धरले आहे.
-देविदास देसाई, अँड. संतोष लोखंडे -( तक्रारदार)
अशा विक्रेत्यांना प्रॉडक्ट देणे बंद करू
- एमआरपी म्हणजे सर्व करांसहित त्या वस्तूची किंमत होय. जर कुणी एमआरपीपेक्षा जास्त दर लावून वस्तू विकत असेल तर अशा विक्रेत्यांना प्रॉडक्ट देणे आम्ही बंद करू. आम्हीही याबाबत स्टिंग करून हा प्रकार बंद पाडू. डीबी स्टारने ही बाब लक्षात आणून दिल्याने चांगले वाटले.
-अजय गायकवाड, -टीम लीडर, युनिलिव्हर, मुंबई
हे तर नियमांचे उल्लंघन
- एमआरपीपेक्षा जास्त किंमत घेणे हे नियमांचे उल्लंघन आहे. वस्तूवर इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस लिहिले असेल तर त्यातून साडेबारा टक्के गुणाकार करून पुन्हा साडेबारा टक्के व्हॅल्यूड टॅक्स भागाकार करावा. किंमत 49 रुपये येते. यातून पावणेसहा रुपये वजा होतात. स्टोअरमध्ये येताना त्याची किंमत 45 एवढी असते, तर स्टोअरबाहेर जाताना एमआरपीनुसार आकारली जाते. हा प्रकार बघता या ठिकाणी पावती देताना महाराष्ट्र व्हॅल्यू अडेड टॅक्स कायदा 2002 चे उल्लंघन झाले आहे.
-अँड. चरणराज देवडा, -कर सल्लागार
..तर तक्रार करा
-ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार या प्रकाराला अनुचित व्यापार प्रकार असे म्हणतात. अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही मालावर किं वा मालाच्या कोणत्याही पुडक्यात दर्शवलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणे गुन्हा आहे. अशा व्यापार्याच्या विरोधात ग्राहक आमच्याकडे रीतसर लेखी तक्रार करू शकतो.
-अँड. रेखा कापडिया, -सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.